क्षणिक सुख…!

SHARE:

सामाजिक क्षेत्रात वावरत असतांना बऱ्याचदा प्रलोभण दिल्या जातात व या प्रलोभनाला बळी पडून अनेकांनी आपले प्राण सुद्धा गमावले आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेऊन साहित्यिक व कवी श्री. संजय अण्णाजी देशमुख यांनी रचलेली कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत.

क्षणिक सुखाचा लोभ…

क्षणिक सुखाचा लोभ करूनी
घात कुणाचा करू नको,
बाग कुणाची फुलली असता
तया कधी तू जळू नको,

होऊनी स्वार्थापायी बावळा
झोप कुणाची मोडू नको.
माझे माझे म्हणुनिया सारे
भार पापाचा वाहू नको,

गरज नसता कधी कुणाच्या
घरात वाकुणी पाहू नको,
बोल व्यर्थ चांडाळी बोलूनी
खोड कुणाची काढू नको,

खोटा डोई गर्वभार वाहुनिया
दुध भाकडीचे काढू नको.
काम आपुलेची साधून घेण्या
मामा गाढवास म्हणू नको,

काया माया मोहात पडुनी
सुखी उंबरा सोडू नको,
बहुरूपी मायावी दुनियेत
उगाच फसत जाऊ नको,

सत्य सोडूनिया असत्याच्या
पाठी उभाही राहू नको,
सत्यासाठी मरणही येता
मैदान आपुले सोडू नको,

वाचाळांच्या मुखी लागुनी
वेळ आपुला दवडू नको,
कर्म धर्मही अन् सत्कार्याथी
मागे पुढे तू पाहू नको.

ध्येय आपुले पुर्ण करण्याही
काटे गोटेही पाहू नको,
जिद्द यशाची मनात ठेवता
हार कधी तू मानू नको.

दारात येता कधीही भुकेला
त्यास उपाशी ठेवू नको,
येता संधी करण्या पुण्याची
तीच कधी रे सोडू नको,

ऋण कुणा अंगावर असता
बेईमान तू होऊ नको,
माणूस म्हणूनी जन्मा आला
दानव होऊनी मरू नको,

 

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
साहित्यिक तथा कवी,
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment