माझिया जातीचे मज भेटो कोणी l आवडीची धणी फेडावया ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

तुकारामांची गणना निश्चितच थोर संतांमध्ये होते. पण तुकारामांचे एकूणच चरित्र आणि अभंगसाहित्य बघता तुकाराम इतर संतांहून वेगळे वाटतात. आज आपण पाहू या तुकारामांच्या अभंगातील आशय आणि अभिव्यक्ती विचार –
तुकाराम बरेचदा काव्यात न शोभणारे शब्द सहजपणे लिहून जातात. फटकळपणा, परखडपणा, रोखठोक भाषा तुकारामांच्या अभंगातून हमखास दिसतेच. असे असले तरी कमालीची अंतर्मुखता आणि आत्मनिरीक्षणाची प्रवृत्ती तुकारामांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. देवाशी सलगी करणारा, संसारात राहून त्यापासून दूर जाऊ पाहणारा, प्रपंच करताना परमार्थाचा मार्ग स्वीकारून आपला तोल जाऊ न देणारा, अशी कितीतरी भिन्न रूपे तुकारामाच्या अभंग गाथेतून दिसून येतात. त्यातूनच तुकारामाचे अध्यात्मिक आणि साहित्यिक व्यक्तिमत्व आपण समोर उभे राहते.

तुकारामाचे बालपण अतिशय सुखात गेले. आयुष्याची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे तर मस्त मजेत आरामात गेली. ऐन तारुण्यात मात्र दुःख, दारिद्रय यांची झळ पोचल्याने तुकाराम संसार विन्मुख बनले. अर्थात त्यांनी संन्यास घेतला नाही, की अनुचित मार्ग स्वीकारला नाही. त्यांच्यावर अनेक संकटांची मालिका कोसळली. ते तसू भरही डगमगले नाही. उलट त्यांनी त्यातूनही सुंदर मार्ग काढला, तो मार्ग म्हणजे विठ्ठलभक्तीचा. याला अनेकांचा विरोध ही झाला. लोकांनी तुकारामांचे हसे केले. संसारासाठी लागणाऱ्या पैशाचा ओढा कमी झाला. सावकार असणाऱ्या तुकारामावर अत्यंत गरिबीची परिस्थिती आली. तुकारामांची मानहानी होऊ लागली. होत असलेल्या कुचंबनेला ते कंटाळले.
“आता काय खावे कोणाकडे जावे l
गावात राहावे कोण्या बळे ll”
म्हणून तुकाराम विठ्ठलाला शोधत निघाले.

त्यांना विठ्ठलाची भक्ती प्रिय वाटू लागली. त्यांना हा संसार असार वाटू लागला. यावेळी त्यांना जे जगाचे अनुभव आले आणि विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. या मनस्थितीमुळे त्यांच्या अभंगातील आशय आणि अभिव्यक्ती विचार हे स्वानुभवातून उतरू लागले. दादरी जाणाऱ्या मुलीप्रमाणेच त्यांच्या जीवाची घालमेल होऊ लागली.

“कन्या सासूर्यासी जाये l
मागे परतुनी पाहे ll”
विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुकारामाचा जीव कासावीस झाला. केशवची भेट कधी होईल म्हणून तुकाराम “जीवना वेगळी
मासोळी” प्रमाणे तळमळी लागले.
“संसारा हाती अंतरलो दुरी l
आता कृपा करी नारायणा ll”
अशी आर्त हाक देऊ लागले. या ठिकाणी तुकारामांनी रचलेल्या अभंगातून तुकारामाच्या व्यक्तिमत्त्वातील कोमलतेचा, संवेदनशीलतेचा, मृदु स्वभावाचा प्रत्यय येतो.

दैनंदिन व्यवहारात्तूकरांचा व्यापारी लोकांशी संबंध आला. धनको, रुणको संबंध जवळून पाहिले. भोवतालच्या दांभिक, स्वार्थी, लोभी, मतलबी लोकांना जवळून पाहिले. त्यांच्या किळसवाण्या मनोवृत्तीचा तुकारामांना वीट आला. म्हणूनच त्यांनी देवाजवळ सज्जनांचा सांग मिळवा म्हणतं करुणा भाकली.
“माझिया जातीचे मज भेटी कोणी l
आवडीची धणी फेडावया ll”
तुकारामाला संत संगतीचा ओढ लागलेली आहे. हे त्यांच्या शब्द शब्दातून जाणवते. ज्यांना हरी हा मनापासून आवडतो अशांची भेट व्हावी अशी तळमळ तुकारामांना लागलेली आहे. “ऐसियांचासंग देई नारायणा” अशी कळकळीची विनंती तुकाराम देवाजवळ करतात.

ईश्वरी कृपा होऊन ही आणि संत संगती लाभूनही तुकारामांचे मन अधून मधून संसाराकडे ओढले जात होते. विषय वासना सुटत नव्हती. संसारात मन गुरफटतच होत. या संसार मायेतून सुटण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतच होते. त्यावेळी त्यांचे जे हाल झाले ते त्यांनी त्यांच्या अभंगातून मांडले आहेत.

“माझे तो स्वभाव मज अनावर l
तुजही देता भार काहीं नव्हे ll”
यावरून त्यांचा स्वभाव त्यांना आवरता येत नाही असे वाटते. ते म्हणतात, माझा स्वभाव मला आवरत नाही. म्हणून तुझ्यावर भर घातला. जागृती आणि स्वप्न यातही काही टाळ राहिला नाही. भक्तीची संपादनी करतो पण तो बाहेरचा रंग आहे. कार्याला पाठ पोट असत नाही. ते एकच जातीचे असते. आपली विषय वेदनेतून सुटका व्हावी म्हणून तुकारामांनी पांडुरंगाला कळकळीची विनंती केली. तुकारामाच्या हृदयात असे अंतर्द्वंद्व चालू असे. अशा प्रसंगातून तुकारामांच्या अभंगातून प्रगट होणारे तुकारामांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे. म्हणूनच सामान्य संसारी माणसाला तुकाराम आपल्यातील आणि जवळचे वाटतात.

 

लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक व कवी, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा