तुका म्हणे, शोभा सांगे…
तुकाराम भक्तिमार्गाकडे वळले आणि भक्ती करू लागले. या भक्तीचा दंतकथा त्यांनी कधीच गुंफल्या नाहीत किंवा त्याबाबतीत त्यांनी कोणतीच अतिशयोक्ती कधी सांगितली नाही. भक्तीचे स्वानुभव सांगण्यास कधी विसरले नाहीत.
परमेश्वरठायी असलेले नितांत प्रेम म्हणजे भक्ती असेच तुकारामाच्या बाबतीत बोलावे लागेल. तुकाराम महाराज सांगतात,
“प्रेम न ये सांगता बोलता दाविता l
अनुभवे चित्ताचित्त जाणे ll”
तुकारामांची भक्ती ही शांतीस्वरूप आहे, वर्णनातीत आहे,ती त्यांच्याच हृदयाचा अनुभव आहे. तुकामाना भक्तीतच परमानंद लाभत होता.
अनेक संतांच्या चरित्र वाचनातून भक्तीमुळे परमेश्वर त्यांना मदत करत होता.त्यांच्या हाकेला धाऊन येत होता. अशा श्रीकृष्णाच्या, पांडुरंगाच्या बाबतीत अनेक कथा वाचायला मिळतात. अनेक पौराणिक दाखले उपलब्ध आहेत. त्यानंतरच्या जनाबाई, संत एकनाथ, गोरा कुंभार अशा अनेक भक्तांच्या मदतीला परमेश्वर धाऊन आला. पंढरपूरचा पांडुरंग जनाबाईला दळण कांडण करू लागला. संत एकनाथ घरी पाणी भरू लागला. खुद्द तुकारामांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडविल्यावर पांडुरंगाने अभंगांच्या बाह्य कोरड्या ठेवल्या. त्यानंतर संतांच्या अनेक पिढ्यांमधून असे अनेक चमत्कार पहायला मिळतात.
वरील अशा कथा खऱ्या की खोट्या ह्या खोलात न शिरता भक्ती साधना मुळे प्रत्यक्ष भगवंत भक्ताकरिता स्वयं प्रेमरूपाने प्रगट होतो हे जाणून घेता येते.
भागवत महात्म्यात भक्तीचा महिम्याबाद सांगितले आहे. की तप, वेदाध्ययन, ज्ञान आणि कर्म इत्यादी कोणत्याही साधनाने भगवतप्राप्ती होत नाही. भक्तीनेच देव प्राप्त करता येतो. यासाठी गोपिकांचे उदाहरण देता येईल.
यावर तुकारामांचे म्हणणे आहे की, हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो. म्हणून मनुष्य जन्मास आल्यावर भक्ती करावी. कारण कलियुगात इतर कोणत्याही साधनापेक्षा भक्ती सर्व श्रेष्ठ आहे.
“मोक्ष तुमचा देवा l
तुम्ही दुर्लभ तो ठेवा ll
मज भक्तीची आवडी l
नाही अंतरी ते गोडी ll”
तुकारामांच्या मते भक्तीचे अंतिम साध्य मोक्ष असले तरीही त्यांच्या मनाला मोक्षाविषयी आवड नाही. तर भक्तीचीच आवड आहे.
“मोक्षपद तुच्छ केले या कारणे l
आम्हा जन्म घेणे युगायुगी ll
विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस l
पुढता पुढता आस सेवावे हे ll”
मोक्ष पदाला तुच्छ लेखून भक्ती रस जन्मोजन्मी सेवन सेवन करावयास मिळावा म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाला कळकळीची विनंती करतात.
“न लगे मुक्ती आणि संपदा l
संतसंग देई सदा ll”
पांडुरंगाच्या भक्तियुक्त प्रेमरंगात अंतर्बाह्य न्हाऊन निघण्यासाठी आणि भक्तांचा सहवास नित्य घडावा म्हणून ते आपले आराध्य परम प्रिय पांडुरंगाला कळकळीची विनंती करतात.
तुकाराम महाराजांच्या घराण्यात परंपरेने पांडुरंगाची भक्ती होतीच. वारीची परंपरा होती. वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी कायम राखली. श्री ज्ञानेश्वर आदी सकळ संतांच्या भक्ती पंथाचे विठ्ठल भक्ती आणि वारकरी पंथ हेच अधिष्ठान होते. त्याच अधिष्ठानावर तुकोबांची देखील दृढ भक्ती आणि निस्सिम श्रद्धा होती.
“आमुची मिरासी पंढरी l
अमुचे घर भीमातीरी ll
पांडुरंग आमुचा पिता l
रखुमाई आमुची माता ll
ईश्वराचे दर्शन, प्रसाद आणि कृपा होण्याकरिता भागवत घर्मात जो भक्तीयोग सांगितला आहे. त्याच मार्गाने तुकाराम महाराज स्वतः गेले. या तिन्ही गोष्टी प्राप्त होण्यासाठी तुकोबाना स्वतःला आलेले स्वानुभवच त्यांनी आपल्या अभंगातून आत्मविश्वासाने व्यक्त केले आहेत.
लेखक –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्य अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






