क्षण एक मना, बैसोनी निवांत, काहीतरी विचार करी आता……..

SHARE:

विचार संपदा…

प्रचलित युगात विविध भौतिक सुविधा वाढल्या आहेत. आजच्या अती फॅशनेबल अशा जीवनशैलीने, आम्ही बिघडण्याच्या वाटेवर आहोत. नात्या गोत्यातील परस्परातील सुसंवाद आज अक्षरशः लोप पावत चालल्याचे दिसत आहे. संपूर्ण जगात उच्चतम अशा आमच्या भारतीय संस्कृतीच्या विचारशैलीचा, आचार विचाराचा र्हास आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात असून, आज प्रत्येक कुटुंबा कुटुंबातील घराचे मांगल्य, पावित्र्य, एकत्रीपणाचा विचार, घरपण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज कौटुंबिक चौकट खिळखिळी व्हायला लागली आहे.

मानवाची वाटचाल विनाशाकडे होत असून, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा या युगाचा गुणधर्म झाला आहे .मुक्तपणे स्वच्छंद जीवन जगणे ही भौतिक सुखाची व्याख्या झाल्याचे चित्र आज दृष्टोत्पत्तीस येत आहे. मनमानी आयुष्य जगण्याच्या लाईफस्टाईल मुळे, समाज जीवनात खूप समस्या निर्माण झाल्या आहेत चंगळवादाचा प्रसार, भ्रष्टाचाराचा कॅन्सर, नीती विचारातील घसरण, फुकट खाण्याची वृत्ती हे त्याचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत. यात परिवर्तन व्हावे ही अपेक्षा आहे. आणि त्याकरता प्रत्येक घरात सुसंस्कार वाढण्यासाठी कौटुंबिक समन्वयाची आवश्यकता आहे.

आदर्श घराची व्याख्या करताना कवी म्हणतात, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती..
ओल असावी त्या द्रव्याला, नकोत नुसती नाणी.. अर्थ असावा त्या शब्दांना, नकोत नुसती नाती.. त्या घरट्यातुनी पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती, पंख असावे आकाशाचे, परी उंबरठ्यावर भक्ती. कुटुंबामध्ये विविध स्वभावाचे घटक असतात. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. स्वाभाविक गुणधर्मात, शैक्षणिक विचारात, आवडी निवडीत सुद्धा फरक असतो. तरीसुद्धा कुटुंबामध्ये आनंद, शांती सुख निर्माण करण्यासाठी आपल्याला नातीगोती सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. स्वाभाविक अहंकार बाजूला ठेवणे, दुसऱ्याच्या भावना दुखावतील असे कठोर शब्द न वापरणे, लहान लहान गोष्टीवर विसंवाद निर्माण होऊ न देणे नातीगोती विचार वर्धिष्णुतेसाठी, निरोगी कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हे आपल्याला करावे लागेल. नात्यागोत्यातील संस्कार नवीन पिढीकडे संक्रमित होणे ही काळाची गरज आहे घराला होम आणि हाऊस असे इंग्रजीत म्हणतात परंतु या दोन स्पेलिंग मधील नावात वेगवेगळ्या अर्थ आहे हेही लक्षात घ्यायला हवे. ज्या वास्तूत निवारा भेटतो आणि मानवी गरजा पूर्ण होतात त्याला इंग्लिश लोक हाऊस म्हणतात. पण ज्या घरात आपणास हवे असणारे प्रियजन राहतात, त्याला होम म्हणतात.

घराचे घरपण टिकवण्यासाठी, नातीगोती टिकवण्यासाठी हा विचार अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक घटकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण सुसंस्कृत कुटुंब ही मूल्य संस्काराची आदर्श अशी शाळा आहे. नात्यागोत्याचा विचार करताना, या बाबीकडे लक्ष वेधले गेले पाहिजे विद्यमान काळात सामाजिक बैठक ही अर्थप्रधान झाल्याने, त्याचा परिणाम नातीगोती तुटण्यात झाला आहे हे वास्तव आहे. या विषयावर कोणीही विचार मंथन करायला तयार नाही. कुटुंबातील नातीगोती नवतरुणाईला समजून सांगण्याची, कौटुंबिक स्नेहभाव विचार प्रबोधन होणे आज काळाची गरज आहे. आजची युवा पिढी ऑनलाईन असल्याने, ऑफ झाल्याचे कटू सत्य आम्हाला उमगत आहे.

नात्यागोत्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, संवेदनशील मनाने नात्यागोत्याच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने विचार करायला हवा,ही काळाची गरज आहे.

 

लेखक – ‌‌ डॉ. ज्ञानेश्वर भानुदाड मिरगे
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,
संत साहित्य अभ्यासक, शेगाव.

डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे

लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा