तुकारामांची भक्ती : साध्य व साधने

SHARE:

ज्याचे निर्मळ अंतर l
तेथे राहे विश्वंभर ll

संत तुकाराम महाराजांनी ज्या साधनांनी साक्षात्कार करून घेतला त्यामध्ये प्रामुख्याने नाम, गुरुभक्ती, संत समागम आणि कीर्तन ही साधने होती.
“जन हे सुखाचे l
दिल्या घेतल्याचे ll”
“धन मिळवूनी कोटी l
सवे न येरे लंगोटी ll”
“पाने खासील उदंड l
अंती जासिल सुकल्या तोंडे ll”
या उद्गारावरून तरी तुकारामांना संसार हा दुःखमय, स्वार्थी वाटतो. मनुष्य जन्माची नश्वरता पटल्यावर त्यांनी परमेश्वरसंबंधी दृढभाव धरला आणि परमेश्वर भक्तीचा साधनांचा आसरा घेतला. भक्तीचे सर्वोत्तम साधन म्हणून नाम महिमा गायीला.
“मुखी नाम हाती मोक्ष l
ऐसी बहुतांसी साक्ष ll”

गुरुभक्ती ही साधकाला आवश्यक आहे. गुरू एखादाच निवडावा लागतो किंवा त्याचा प्रसाद तरी प्राप्त व्हावा लागतो. तुकारामांना गुरूपदेश होऊनही त्यांनी नामाचा महिमा सांगितला आहे.
संत अनेक प्रकारचे असू शकतात. संत ओळखण्याची सूक्ष्म दृष्टी तुकारामांना अवगत होती. संगतीने पंगतीचा लाभ होतो म्हणून संत समागम हवा.

कीर्तन म्हणजे हरिकथेचे निरुपण करणे. कीर्तन ही विश्रांतीची सावली आहे. देव, भक्त व नाम असा त्रिवेणी संगम हरिकथेत होत असल्याने साधकाला कीर्तन ही साधन अधिक उपयुक्त ठरते.
एकंदरीत साधना म्हणजे “माळेतील मणी” ओढणे किंवा जपणे नाही. तर ईश्वराच्या आराधनेत मन, वाचा व काया या तिन्हींचा समावेश व्हावा याहून बाकीच्या पसाऱ्याची तेथे फारशी जरूरी नाही. हठयोग, मंत्र, तंत्र, तप, व्रतवैकल्ये, तीर्थपाणी याचा उपयोग साधकाला काहीच होणार नाही. चित्त शुद्धी हाच एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे.

तुकाराम महाराज म्हणतात,
“करुनिया शुद्ध मन l
नारायण स्मरावा ll”,
“ज्याचे निर्मळ अंतर l
तेथे राहे विश्वंभर ll”,
“मूळ नाही चिता l
तेथे देवाचीच सत्ता ll”
या वचनातच तुकारामाच्या साधन मार्गाचा सार आहे.
“पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी l जागृती स्वप्नी पांडुरंग ll”
ध्यानी, मनी, स्वप्नी पांडुरंगाला पाहण्याचे वळण तुकारामांच्या इंद्रियांना पडले होते. हरिनाम स्मरण हे ध्यानाचेच स्वरूप आहे. नावाशिवाय ध्यानाची किंमत नाही. एकांतात हरिनाम चिंतनाच्या दुःखाचा लाभ होतो आणि जनपिडाही कमी होते. म्हणून त्यांनी गावात भजन, पूजन, हरीजागर, कीर्तनपुरता संबंध ठेवला होता. वैराग्य प्राप्तीनंतर तुकोबांनी देवाच्या प्राप्तीसाठी अनेक साधने केली. त्यात सत्संग, आणि ग्रंथाध्ययंन या साधनांना प्राधान्य दिले. सत्संगतीने भगवत प्रसाद जोडला आणि एकांत सुखात वायुवेगाने ग्रंथाध्ययन केले.

अशाप्रकारे उपास्य दैवतांची आणि त्याच्या भक्तीचा अनेक साधनांची विपुलता असली तरी तुकारामांनी विठ्ठल ही एकच उपास्य दैवत निवडले आणि नामस्मरण हा एकच मार्ग धरला.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड,
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा