अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित आणि प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टद्वारा संचालित विनायक विद्यामंदिर महाविद्यालयात महिलांचे हक्क, सुरक्षितता, कायदेविषयक जनजागृती आणि त्यांच्या समस्यांचे योग्य निवारण करण्यासाठी नवनियुक्त ‘महिला कक्ष समिती‘ चे उद्घाटन अतिशय उत्साहात पार पडले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापिका आणि महिला कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या दिमाखदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. पद्माकर टाले हे होते, तर प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून डॉ. वंदना टाले (माजी अधिव्याख्याता, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती) उपस्थित होत्या. तसेच प्रा. कल्पना ठाकरे (प्राचार्या, विनायक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय), डॉ. शीतल काळे (प्रभारी प्राचार्या, विनायक विद्यामंदिर वरिष्ठ महाविद्यालय), महिला कक्ष समितीच्या समन्वयक डॉ. दीपावली राऊत, नॅक समन्वयक डॉ. नरेंद्र वानखडे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत गाडगे बाबा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. अतिथी स्वागताची परंपरा जोपासत उत्साही वातावरणात सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले.
पी. के. एम. टी. संस्थेच्या माननीय अध्यक्षा आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या संदेशातून नवनियुक्त समितीला शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “आमच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना केवळ उच्च शिक्षण देणे नसून, त्यांना एक सुरक्षित आणि आश्वासक वातावरण देणे हे आहे. महिला कक्ष समितीच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्रत्येक महिला घटकाला आपले प्रश्न हक्काने मांडता येतील. ही समिती संस्थेच्या तसेच महाविद्यालयाच्या शिस्तीत आणि महिलांच्या आत्मविश्वासात भर घालेल.” संस्थेचे सचिव माननीय श्री. यश खोडके यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “कामाच्या ठिकाणी आणि शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांच्या समस्यांचे वेळेत निवारण होणे गरजेचे आहे. ही समिती महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत दुवा म्हणून काम करेल. संस्थेच्या वतीने या समितीला आणि त्यांच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य लाभेल.”

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. वंदना टाले म्हणाल्या, “आजच्या आधुनिक युगातही महिलांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. महिलांचे सक्षमीकरण आणि विकास होण्यासाठी त्यांना सुरक्षित, आदरयुक्त व निकोप वातावरण मिळणे गरजेचे आहे. विनायक विद्यामंदिर महाविद्यालयात स्थापन झालेली ‘महिला कक्ष समिती’ केवळ तक्रार निवारण केंद्र न राहता, विद्यार्थिनींना आणि महिला कर्मचाऱ्यांना कोणत्याही भीतीशिवाय आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी एक हक्काचे आणि विश्वासाचे व्यासपीठ ठरेल. महिलांनी लैंगिक अत्याचार, वर्णभेद आणि आरोग्यविषयक असमानता यांसारख्या अत्यंत गंभीर समस्यांचा सामना केला आहे. या आव्हानांविरुद्ध जागतिक आणि स्थानिक पातळीवर मोठे लढे उभारले आहेत. घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण याविरुद्ध महिला संघटनांनी वर्षानुवर्षे कायदेशीर लढे दिले आहेत. त्याचीच फलश्रुती म्हणजे भारतामध्ये निर्भया प्रकरणानंतर (२०१२) कायद्यांमध्ये कडक बदल करण्यात आले. कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी ‘पोश’ कायदा (२०१३) लागू करण्यात आला. वर्णद्वेषी समाजात महिलांना रोजगाराच्या कमी संधी, कमी वेतन आणि सामाजिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. याविरुद्ध आजही जागतिक स्तरावर लढा सुरू आहे. आरोग्य क्षेत्रात महिलांच्या गरजांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष झाले आहे. यासाठी महिलांनी आरोग्याच्या अधिकारांसाठी मोठे संघर्ष केले आहेत.”
या प्रसंगी नॅक समन्वयक डॉ. नरेंद्र वानखडे यांनी देखील “महिलांच्या सुरक्षिततेसाठी, प्रगतीसाठी कायदे बदलणे आणि समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पद्माकर टाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सुरक्षित वातावरण देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. या समितीच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक समस्येचे वेळेत, गोपनीय आणि योग्य निवारण केले जाईल. ही समिती केवळ अडचणी सोडवणार नाही, तर महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यशाळा व व्याख्याने वर्षभर राबवेल.”

महिला कक्ष समितीच्या समन्वयक डॉ. दीपावली राऊत यांनी समितीच्या आगामी कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. “महाविद्यालयात कोणताही त्रास झाल्यास विद्यार्थिनी थेट या कक्षाशी संपर्क साधू शकतात. विद्यार्थिनीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. महिलांच्या न्यायिक हक्कांसाठी ही समिती सदैव तत्पर आणि खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी दिला.
या प्रसंगी महिला कक्ष समितीच्या माजी समन्वयिका प्रा. संगीता बंड, प्रा. पल्लवी ताथोड (सदस्य, म. क. समिती), वैशाली कराळे (शिक्षकेतर महिला कर्मचारी सदस्य, म. क. समिती) उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख डॉ. सागर पडोळे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. राजेश बजाज, सीम्रेला देशमुख, प्रा. हितेश भागवत, प्रा. विशाल वरघट, प्रा. हर्षल इंगळे, प्रा. केतकी खेडकर, प्रा. विधिनी शेंडे, प्रा. रोशन दवंडे, प्रा. अश्विनी राऊत, प्रा. योगिता असवार, प्रा. क्षितिजा काळे, ग्रंथपाल पूनम राऊत आदी उपस्थित होते. या वेळी विनायक विधी महाविद्यालयाच्या महिला कर्मचारी वैशाली नागे देखील उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध नियोजनाची धुरा सागर देशमुख, रोशन माहोरे, भाग्यश्री देशमुख, वैभव बांडाबुचे, खुशबू असलोट यांनी सांभाळली. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन महिला कक्ष समितीची विद्यार्थी प्रतिनिधी संस्कृती दिंडोकार हिने केले, तर आभार अमृता अडीकने हिने मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






