केळीच्या बागा मामाच्या…. आणि हरवत चाललेलं मामाचं गाव

SHARE:

“केळीच्या बागा मामाच्या,
पिवळ्या घडांनी वाकायच्या…
मामा आमचा प्रेमाचा,
घडावर घड धाडायचा…”

ही कविता ऐकली की आजही मन नकळत माझ्या बालपणात जाऊन पोहोचते.
इयत्ता तिसरी-चौथीत असताना शाळेच्या पहिल्या तासाच्या आधी आम्ही मुलं ही कविता तालात, ठेक्यात म्हणायचो. कविता सुरू झाली की वर्गातील वातावरणच बदलून जायचे. त्या शब्दांबरोबर डोळ्यांसमोर उभी राहायची ती हिरवीगार केळीची बाग… उंच खांबासारखी दिसणारी केळीची झाडं, लांबच लांब हिरवी पाने आणि त्याखाली झुलणारे केळीचे घड!

वास्तविक माझ्या मामाकडे केळीची बाग नव्हती. पण बालमनाला वास्तवाची काय पर्वा असते? कवितेतील मामा आपलाच वाटायचा आणि त्याची केळीची बागही आपलीच!
“आक्का मोठी हौसेची, भरपूर केळी सोलायची,
आत्या मोठ्या हाताची, तिनेच साखर लोटायची.
आजी आमची मायेची, सायच साय ओतायची,
ताई नीटस कामाची, जपून शिकरण ढवळायची…”
या ओळी म्हणजे केवळ कविता नव्हती; त्या काळच्या घरातील प्रेमाची, आपुलकीची आणि एकत्र कुटुंबाच्या संस्कृतीची जिवंत चित्रं होती.

आमच्या घरीही शिकरण हा काही विशेष पदार्थ नव्हता. दोन दिवसांतून एकदा तरी घरच्या जेवणात शिकरण असायचीच. पण मामाच्या गावाला जाणे म्हणजे शिकरणीची चवही वेगळीच लागायची!
मामाचं गाव म्हटलं की आनंदाला उधाण यायचं. वर्षातून किमान दोन वेळा तरी मामाच्या गावाचा बेत ठरायचा. मामा-मामी, आक्का, आत्या, आजी-आजोबा, मावशी… सगळी नाती जिवंत होती. कुणाच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची औपचारिकता लागत नसे. आपली माणसं आहेत, आपण कधीही जाऊ शकतो, ही भावना होती.
अवेळी गेलो तरी चेहऱ्यावर आनंद असायचा.
“अरे, आलास? किती दिवसांनी आलास!”
या एका वाक्यात किती प्रेम सामावलेले असायचे!

घरात अचानक पाहुणे आले की अडचण नव्हे, तर आनंद मानला जायचा. घरात जे असेल ते वाढले जायचे. एखादी भाजी कमी पडली तर भाजीला पाणी वाढवले जायचे; भाकरी जास्त थापल्या जायच्या; आणि शेवटी प्रेमाचा घास आग्रहाने तोंडात घातला जायचा.

कवितेच्या शेवटच्या ओळी तर त्या काळातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे सुंदर चित्र उभे करतात—

“आई आग्रह करायची,
पुरे पुरे तरी वाढायची,
वाटीवर वाटी संपवायची,
मामाला ढेकर पोचवायची!”
आज विचार केला तर जाणवतं—त्या शिकरणीत केळी, साखर आणि दूध एवढंच नव्हतं; त्यात मायेचा गोडवा मिसळलेला होता.

आज काळ बदलला आहे.
माणसं जवळ आली, पण मनं काहीशी दूर गेली. मोबाईलच्या एका क्लिकवर आपण जगभरातील माणसांशी जोडले गेलो; पण कधी कधी आपल्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आपल्याच माणसांशी बोलायला वेळ नसतो. पूर्वी मामाच्या गावाला जाण्यासाठी कारण लागत नसे. आज भेटण्यासाठी तारीख ठरवावी लागते. पूर्वी “कधीही या” असं मनापासून म्हटलं जायचं; आज “वेळ काढून या” असं म्हणावं लागतं.
पूर्वी पाहुणे आले की घर भरून जायचं; आज पाहुणे आले की वेळापत्रक बदलतं.
पूर्वी नाती सांभाळण्यासाठी वेळ दिला जायचा; आज वेळ उरला तर नाती आठवतात.

याचा अर्थ आजची माणसं प्रेम करत नाहीत असा नाही. प्रेम आजही आहे. पण त्या प्रेमाभोवती धावपळ, व्यस्तता, अंतर, अपेक्षा आणि औपचारिकतेचे अनेक थर चढले आहेत. म्हणूनच “मामाचं गाव” हे आता फक्त एक भौगोलिक ठिकाण राहिलेलं नाही. ते आपल्या मनात जपलेलं एक सुंदर बालपण झालं आहे. त्या गावात जाण्यासाठी आज बस, रेल्वे किंवा कारची गरज नाही. फक्त डोळे मिटायचे आणि बालपणाच्या आठवणीत जायचे.

हिरवीगार केळीची बाग दिसते…
केळीचे घड दिसतात…
आजी साय ओतते…
ताई शिकरण ढवळते…
आई आग्रहाने वाढते…
आणि आपण वाटीवर वाटी शिकरण संपवत असतो!
मग अचानक कुठून तरी त्या कवितेचा आवाज कानात घुमतो
“केळीच्या बागा मामाच्या,
पिवळ्या घडांनी वाकायच्या…”
आणि मन पुन्हा एकदा ताजंतवानं होतं.

कदाचित आज आपल्याकडे त्या काळापेक्षा अधिक पैसा आहे, अधिक साधनं आहेत, अधिक सुविधा आहेत; पण त्या काळातील माणसांचा वेळ, आपुलकी आणि नात्यांचा मोकळेपणा आपण कुठेतरी गमावला आहे. म्हणूनच आता पुन्हा एकदा मामाच्या गावाची वाट धरायला हवी. कुठल्याही मोठ्या कारणासाठी नाही…
फक्त आपल्या माणसांना भेटण्यासाठी.
अचानक त्यांच्या दारात उभं राहण्यासाठी.
“काय रे, अचानक कसा आलास?” या प्रश्नात लपलेलं प्रेम अनुभवण्यासाठी.
आणि कदाचित एखाद्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून शिकरण खावी…
कारण शिकरणीची खरी चव केळी-साखरेत नसते; ती माणसांच्या सहवासात असते. मामाचं गाव हरवलेलं नाही…
ते अजूनही आपल्या आठवणींत जिवंत आहे.
फक्त त्या आठवणींना पुन्हा वर्तमानात आणण्याची गरज आहे.
आणि म्हणूनच आज मनापासून वाटतं

“केळीच्या बागा मामाच्या…” ही केवळ बालभारतीतील कविता नव्हती; ती आमच्या पिढीच्या नात्यांची, मायेची आणि हरवत चाललेल्या बालपणाची गोष्ट होती.

 

लेखक –
इंजि. प्रदीप चौधरी
हेल्थ अँड लाइफ कोच 
H24 FIT CIUB and NUTRI WORLD, नागपूर.
संपर्क – ८६६८४६६४३८

इंजि. प्रदीप चौधरी
Author: इंजि. प्रदीप चौधरी

लेखक नागपूर येथील रहिवासी असून अमरावती येथील कृषिदेव खत कारखान्यात कारखाना व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेशाने ते यांत्रिकी अभियंता आहे, त्याचबरोबर समाजातील आरोग्य आणि फिटनेस जनजागृतीसाठी ते हेल्थ अँड लाइफ कोच म्हणूनही कार्यरत असून समाजप्रबोधनाचे कार्य सक्रियपणे करतात. साहित्याची आवड असल्यामुळे ते सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य व जीवनशैली विषयक लेखन नियमितपणे करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांचे लेख सोशल मीडिया मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक लेखणीद्वारे ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयांवरील महत्त्वपूर्ण विचार जनतेसमोर मांडतात. आपले विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून ते नेहमी प्रखरतेने मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा