विचार संपदा…
आपणाला प्राप्त झालेल्या दुर्लभ नरदेहाचा आणि मर्यादित आयुष्याचा उपयोग विधायक पद्धतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टिकोन वर्धिष्णु व्हावा म्हणून, संतांनी समाज मनाचे सातत्याने प्रबोधन केले… घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणाना.
आपण पैशामागे, प्रतिष्ठे मागे प्रसिद्धीसाठी, तोंडात फेस येईपर्यंत सारखे धावत असतो. एक धावतो म्हणून, दुसरा धावतो म्हणून तिसरा धावतो.. धावणाराला कोठे थांबावे हेच कळेनासे झाले आहे. धावता धावता शेवटी थकून गेला की, मग ईश्वराचे आपण स्मरण करतो. उशिरा सुचलेले हे शहाणपण असते. आज जीवनामधील वास्तव परिस्थिती अशी आहे की, आज इमारतीची उंची वाढली परंतु माणसाची उंची कमी होत आहे. संतांचा विचार जोपासल्याशिवाय जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही.
स्वामी समर्थ म्हणतात, सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोची तो मानवी धन्य होतो परमेश्वर प्राप्ती हे परमार्थाचे लक्ष आहे. प्रापंचिक समृद्धीसाठी परमार्थातही भक्तीच्या नावाखाली स्वार्थ साधना करणाऱ्यामुळे, अध्यात्माची शोकांतिका झालेली आहे. समाधानी जीवनाला तडे जातील असे वाढते हव्यास विज्ञानामुळे वाढले आहेत. माणसाची अंन्तर्मुखता कमी झाली आहे. सगळा मूल्यविचार ढवळून निघाला आहे. अखंड स्पर्धा, ताण तणाव, आणि नवनवीन आजार हेच या युगाचे योगदान म्हणण्याची वेळ आली आहे. जगभर भौतिक सुविधांचा महापूर, परंतु मन..शांती कुठेही आढळत नाही. अशा ह्या वास्तव परिस्थितीमध्ये श्रेष्ठतम जीवनमूल्य आचरणाचा विचार होणेआवश्यक आहे.
संपूर्ण श्री. भगवदगीतेचे सार असणारा श्लोक, भगवान गोपाल कृष्णानी अर्जुनाला सांगितला…
मत्कर्म क्रुन्मत परमो मद्भभक्ता संग वर्जिता.. निर्वैर.. सर्वभूतेषु य..स मामेती पांडवा..
अ.11.55.
हे अर्जुना, माझ्यासाठी कर्म करणारा माझा भक्त संपूर्णपणे अआसक्ती रहित जीवन जगतो. असाच भक्त मला प्रिय असतो. मंदिरात गेल्यावर देवापुढे विनम्र होऊन, सर्व भावाने शरण जाणे आणि मग त्याला प्रपंचातील विविध समस्या वर, काहीतरी मागणी करणे ही मानवी मनाची दुर्बलता आहे. दुःख बांदवडी अशा या संसारात, वारंवार दुःखाची अनुभूती होते. अशावेळी दुःख पेलण्याचं सामर्थ्य देणारे त्या प्रभूचे भावपूर्वक ध्यान चिंतन मनन करणे आणि सामान्य जीवनामध्ये सदाचरण करणे हेच खऱ्या अर्थाने प्रभूचे पूजन आहे.
मनातील स्वार्थी विचार नष्ट झाल्याशिवाय, विश्वप्रभुचे दर्शन होत नाही म्हणूनच, संत श्री. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले आहे की, थोरपण पर्हा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जै जगा धाकुटी होईचे ते जवळीक माझी.. लौकिक दृष्ट्या अति नम्र आणि रिक्त होऊन, आपण प्रभुजवळ गेलं पाहिजे. श्री रामायणामध्ये एक सुंदर बोधपर उदाहरण दिलेले आहे. अयोध्येतील मंत्री सुमंत याच पद्धतीने श्रीरामा जवळ गेले. श्रीराम भेटीला जाताना सुमंतने सात प्रकारचे दरवाजे ओलांडले, तेव्हा कुठे श्रीरामाची भेट झाली. काय केले सुमंताने.. पहिल्या दरवाजात, सुमंताने रथ सोडला. दुसऱ्या दरवाज्यात सोबत नेलेली चामरे सोडली. तिसऱ्या दरवाजात पादत्राणे सोडली. चौथ्या दरवाजात अर्थ, पाचव्या दरवाजात स्वार्थ आणि सहाव्या दरवाज्यात मी तू पणाचा त्याग केला. तेव्हा प्रभूची आणि सुमंतची हृदय भेट झाली. अहंभावाचा त्याग करा, संत चरणी भाव धरा आणि मुक्ती सायुज्जता वरा हेची करा बापांनो, असेच संत महात्मे आपल्याला सांगत आहेत.
एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा..
संत समागमु धरावा, तेणे ब्रह्मानंद होय आघवा गा….
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा…
लेखक –
ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्य उपासक, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.





