या अभंगातून तुकाराम अभंगा विषयी बोलत आहेत. भक्ती नऊ प्रकारची आहे. तिलाच नवविधा भक्ती म्हणतात, नवविधा भक्ती जो जाणतो तोच खरा भक्त, असे तुकाराम महाराज म्हणतात. भक्तीचे लक्षण तुकाराम महाराज सांगताय जो जिव्हाळ्याची भक्ती जाणतो तोच खरा देवाचा पुतळा आहे.
साक्षात्कार झाल्यानंतर तुकाराम
तुकाराम केवळ उपकारपुरते उरले आणि आपल्या जीवनकार्य धर्मरक्षण करणे हे त्यांनी ठरवून टाकले. “धर्म रक्षणासाठी, करणे आटी आम्हासी” या त्यांच्या उद्गारानुसार “पिटू भक्तीचा डांगोरा” असे म्हणून त्यांनी ईश्वर भक्तीचा डांगोरा पिटण्यास सुरवात केली..
तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या ठिकाणी भक्तीचा जिव्हाळा नाही. असा एखादा पंडित अगर शहाणा जरी असला तरी तो माझ्या मनाला आवडत नाही. देवाच्या नामरूपा चे ठिकाणी ज्याचे चित्त गढून गेले आहे, त्याचा मी अंकित झालेला दास आहे. तुकाराम महाराज पुढे असेही म्हणतात की जो नवविद्या जाणतो तोच शुद्ध भक्त आहे. विठ्ठल हा सर्वात्मक ईश्वराचे प्रतीक आहे. हे लक्षात घेऊनच तुकारामाच्या अभंगातून व्यक्त होणाऱ्या विठ्ठल भक्तीकडे आपण पाहिले पाहिजे.
भक्ती ही सर्व व्यापक ईश्वराविषयीची प्रेमभावना आहे. ईश्वराला सर्व व्यापक म्हटल्यानंतर विश्वातील सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना निर्माण व्हायला पाहिजे. सर्व प्राण्यांविषयी प्रेमभावना म्हणजेचभक्ती होय. कारण ईश्वर चराचरातील प्राणिमात्रांच्या हृदयात वास करतो. म्हणूनच भक्ती ही जिव्हाळ्याची प्रेमभावना आहे.
“जाणे भक्तीचा जिव्हाळा l
तोचि देवाचा पुतळा ll”
तुकारामांच्या ह्या उद्गारातून हाच अर्थ प्रतित होतो. भूतमात्राविषयी दया दाखविणे हा ईश्वराचा स्थायीभाव आहे. याच जाणिवेतून तुकाराम महाराज म्हणतात,
देव दयाळ दयाळ l
करी तुक्याचा सांभाळ ll
सर्वात्मक ईश्वराच्या भक्तीचे जिव्हाळ्याचे प्रेम जो जाणतो तो प्रत्यक्ष देवाचा पुतळा आहे. असे तुकाराम महाराज मानतात. भक्तिमार्गाला लागलेल्या भक्तांचा परमेश्वर उद्धार करतो. म्हणूनच तुकारामाला भक्त आवडतात. भक्ती न मानणारे पंडित कितीही विद्वान असले तरी प्रेमशून्य वा भक्तीशून्य भक्तलोक तुकारामाला आवडत नाहीत. विश्वातील नामरूपानी व्यक्त झालेल्या ईश्वराच्या ठिकाणी ज्याचे चित्त जडले ते दास होऊ इच्छितात. अशा भक्ताने श्रवण, कीर्तन, ईश्वराचे स्मरण, चरणसेवन, पूजा, वंदन, दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नव विधा भक्ती जमल्या पाहिजेत.
“श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पदसेवनम् ll
अर्चनम वंदनं दास्यम सख्यम् आत्मनिवेदनम् ll”
अशा ह्या नवविधा भक्ती जाणणाराच शुद्ध भक्त होय. तुकोबांनी भक्तिमार्गातील नवविधा भक्तीचा उल्लेख केला असला तरी त्यांनी नामस्मरण व कीर्तन भक्ती यांनाच महत्व दिलेले आहे. त्यात त्यांनी श्रवण भक्तीचाही समावेश केलेला आहे. देव आणि भक्त यांच्यात कोणतेही भेद उरत नाहीत त्यावेळी त्यांच्यात आत्मनिवेदन भक्ती येते. तसेच वंदन व दास्य भक्तीचा ही उल्लेख स्पष्ट पाने दिसून येतो.
“वंदन मी भुते l
आता अवघीची समस्ते ll”
या ठिकाणी वंदन ह्या भक्तीच स्पष्ट उल्लेख आहे. तुकाराम महाराज म्हणतात “या चराचरातील समस्त प्राणीमात्रांना मी वंदन करीन. त्यांच्या रूपात पदोपदी मी नारायणाला पाहिन. वरचा दिसणारा भेद बाजूला ठेवून. वेदाचे तसे प्रमाण आहे. म्हणजे तुमच्याशिवाय दुसऱ्याचा संबंध येणार नाही. वंदन भक्तीप्रमाणेच तुकोबांनी चरण सेवेबद्दल आपल्या अभंगातून सांगितले आहे.
“घेईन मी जन्म यासाठी देवा l
तुझी चरण सेवा साधावया ll
हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारात लोटांगणघळून चरणसेवा साधावी म्हणून पुणे याच गोष्टींसाठी जा मिळावा म्हणून तुकाराम महाराज अपेक्षा ठेवतात. त्यासाठी मी कुठेही आनंदात राहीन. सुख दुःखाची चाड ठेवणार नाही. बाकीच्या सर्व गोष्टीवर मी उदास राहीन. तुकारामांनी कीर्तन, अर्चना म्हणजे पूजा भक्ती बद्दलही सांगितले आहे.
“अर्चना वंदन नवविधा भक्ती l
दया क्षमा शान्ति या ठायी ll”
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
संपर्क – 9523279432
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






