गुरूंच्या आशीर्वादाची फलश्रुती…
संस्कृती – संस्कारसंपन्न भारत देशातील महाराष्ट्र हे महाराज्य नर नारी रत्नांची खाण आहे. छञपती शिवराय, संभाजी राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मां जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादी कर्मयोगी महान व्यक्तींनी या पवित्र भूमीत जन्म घेतला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा अशा शेकडो संतांनी जन्म घेऊन महाराष्ट्र भूमीचे महत्त्व वाढविले. त्यातही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात नरश्रेश्ठ, संतश्रेष्ठ राष्ट्रसंत गडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होउन गेले. गुरुमाऊली अडकोजी महाराज, प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराज, पूर्ण महाराष्ट्रावर अध्यात्मिक राज्य करणारे अच्युत महाराज सारखे संत होऊन गेले या सर्वांनी तळागाळातल्या जनतेच्या लोकोध्दारासाठी आपले आयुष्य वेचले.
राष्ट्रसंत गाडगेबाबानी आपल्या संकिर्तनातून सतत जागर केला. तर राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांनी दोन पाऊले पुढे टाकून भजन कीर्तन करुन ग्रामगीता, अभंगगाथा, हिंदी मराठी भजने, हिंदी मराठी श्लोक, सुविचार, ओव्या, भाषण संग्रह, पत्र संग्रह ई. साहित्य भरपूर प्रमाणात लिहून मराठी हिंदी वांगमयात मोलाची भर टाकली आहे. या सर्व वक्तृत्व, लेखन प्रपंचातून परमेश्वर भक्ती बरोबरच देश भक्तीचे दाखले देऊन समाज जागृतीसाठी, समाजसेवेसाठी अंतरात्मा जागा केला. वं. राष्ट्रसंतांचे साहित्य पुत्र म्हणून सरस्वती पुत्र म्हणून केलेले हे कार्य अद्वितीय आहे.
प्रत्येक सत्पुरुष हा त्याच्या कार्यामुळे त्या त्या युगाचा युगनायक असतो. प्रसव असतो, युगप्रवर्तक ठरतो. आजचा काळ हा केवळ अध्यात्माचा आणि प्रपंच मांडण्याचा नाही. “सर्व भूतहितेरत:” या सूत्रानुसार समाजाला भरभरून देण्याचे कार्य वं. राष्ट्रसंतांनी केले. आपल्या कर्माला भक्तीची जोड देऊन जीवन नीतीने, प्रामाणिकपणे, भयमुक्त जगण्यासाठी गोडी निर्माण केली. सर्व समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी दिलेले उपयुक्त विचार ही आजच्या काळाची गरज ओळखून राष्ट्रसंतांनी केलेले कार्य अनमोल आहे.
वं. राष्ट्रसंताच्या अलौकिक कार्याबद्दल संत, महात्मे, अभ्यासू, विद्वतजन, यानी दखल घेऊन उकल करून दाखविली आहे. पूर्वसुरिकडून असे सांगितले जाते की वं. तुकडोजी महाराजांचे गुरूदेव अडकोजी महाराजांनी त्यांच्या मातोश्रीस आंब्याचा कृपाप्रसाद दिला. वं. राष्ट्रसंतांच्या जन्मानंतर गुरूदेव अडकोजिनी तुकडोजींच्या जीवनात चार वेळा शक्तिपात केला. याचा उल्लेख वं. राष्ट्रसंत म्हणतात,
“गुरूदेव ने मेरे उप्पर तो शक्तिपात ही कर दिया l
सारे विषय पलटे मेरे, स्वानंद सुख अजमा दिया l”
वं. राष्ट्रसंतांच्या बारश्याला प्रत्यक्ष प्रज्ञाचक्षु श्रीसंत गुलाबराव महाराज हजर होते त्यांनी स्वतः बाळाला झोका दिला आणि राष्ट्रसंतांचे पाळण्यातील नाव “माणिक” असे ठेवले. खऱ्या हिऱ्याची पारख संतच करू शकतात. संतांचा आशीर्वाद राष्ट्रसंताना लाभला. त्या आशीर्वादाने ते संतपदा पर्यंत पोचले आणि तो आशीर्वाद प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी हयात भर अपार कष्ट केले.
आशीर्वादाचे गाठोडे सोबत घेऊन वं. राष्ट्रसंतांनी लहानपणीच घर सोडले. बावळा वेश धारण करून, देहभान विसरून देव दर्शनासाठी त्यांनी भ्रमंती सुरू केली. ध्यानधारणा सुरू केली. आपल्या देहाप्रती ते अनासक्त झाले. संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे “देही असूनी, भोगी, विदेही अवस्था” अशी त्यांची स्थिती झाली. आपल्या हृदयातील भावभक्ती बद्दल राष्ट्रसंत म्हणतात. “मैने अपनी भवभक्ती को सरला मुडवा दिया l देशभक्ती, राष्ट्रसेवा ही को प्रभुसेवा किया l” याचा अर्थ त्यांची मूळ अवस्था प्रभूसेवा, राष्ट्रसेवा हीच आहे. म्हणूनच त्यांची ती भावावस्था कधीच सुटली नाही.
“आनंद का अक्षय खजाना नीत हमारे पास है l
तुकड्या कहे सबको लुटा दू l बस यही आस है l”
वं. तुकडोजी महाराजांनी स्वतःला अनेक कसोट्यातून कठीण परीक्षा देऊन उत्तीर्ण केले. नंतरच ते पूर्णावस्थेत स्थिरावले. गुरुकृपेचा त्यांना कधी विसर पडला नाही. माझे गुरू, श्रेष्ठ संत आहेत हे सांगताना वं. तुकडोजी म्हणतात,
“संतापाशी एकची धर्म, सकळ जीवाचे कल्याण कर्म l
मानवता हेची मुख्य वर्म l सर्वकाळ ll”
आपल्या गुरूचा आदर्श समोर ठेवून ते कल्याणकारी कार्य करतच राहिले. एवढे प्रचंड लेखन करून आणि दुसऱ्याच्या उध्दराचा सर्वतो परी विचार त्यांच्या चरित्रात दिसतो. ही त्यांच्या गुरूच्या आशीर्वादाची फलश्रुती आहे.
आपल्या साहित्यात ठायीठायी ते आपल्या गुरूची ओळख करून देतात.
“आजी धन्य दिवस झाला, स्वामी सदगुरू भेटला l
तुटली संसाराची आस, झालो अडकोजीचा दास ll”
सद्गुरूच्या शक्तिपाताने त्यांचे सारे आयुष्य बदलून गेले परमेश्वर भक्तीने स्वानंद सुख अजमावता आले. अहंकार समूळ नष्ट झाला. याचे कोणतेही श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत.
वं. तुकडोजी महाराज देव, धर्म, ध्यान, तपस्या आराधना, उपासना, यात अडकलेले दिसत नाहीत. तर त्यांनी जे काही दिव्य ज्ञान मिळवले त्याचा प्रचार आणि प्रसार लोकउद्धरासाठी कसा होईल यासाठी ते आजन्म धडपडत राहिले. खंजिरी वाजवून भजनांच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, विविध प्रकारच्या लेखनाच्या माध्यमातून मानव कल्याणाचे मार्ग सांगू लागले.
त्यांनी सांगितलेल्या एकेका विचारावर शेकडो प्रबंध व्हावेत. असे उत्तम, उन्नत व उदात्त दर्जाचे त्यांचे लोकोपयोगी विचार आहेत. त्यांचे कोणतेही साहित्य वाचले तर तुमच्या समोर अगाध ज्ञानाचे भांडार उघडे होईल. मानवाचा उद्धार व्हायचा असेल तर तो जिथे राहतो, त्या ग्रामाचा म्हणजे गावाचा उद्धार व्हावा, हा त्यांचा विचार देशोद्धरा कडून विष्वोद्धाराकडे नेणारा आहे.
“गाव हा विश्वाचा नकाशा l
गावावरून देशाची परीक्षा ll
गावाची भंगता अवदशा l
येईल देशा ll.”
ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेत ते लिहितात,
“सर्व ग्रामासी l सुखी करावे ll
अन्न वस्त्र पात्रादी द्यावे ll
परी स्वतः दुःखची भोगावे l
भूषण तुझे ग्रामनाथा ll”
त्यांच्या संपूर्ण लिखाणाचा आत्मा ग्रामोद्धार आहे. आज विज्ञाना मुळे जगभर प्रगती झालेली दिसत आहे त्यामुळे मानवासमोर असंख्य सूखे हात जोडून उभी आहेत. काही मूठभर लोकांनी शिक्षण घेतल्याने त्यांची जीवन शैली बदलली आहे. पण उद्या या जीवनशैलीचा प्रसार झाल्यास घात होण्याची लक्षणे दिसत आहे. विज्ञानाच्या प्रगतीसोबत माणुसकी नष्ट होतं काम नये विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अध्यात्मिक संस्कार आवश्यक आहेत. समाजात शांतता, समाधान, समृद्धी, नांदावयाची असेल तर प्रत्येकाने वं. तुकडोजीच्या साहित्याचे परिशीलन करून ते आचरणात आणण्याची गरज आहे.
ग्रामगीतेत तुकडोजी महाराज म्हणतात,
“गीता बोधीली अर्जुनाला l ग्रामगीता ही सर्वाला ll
राहू नये कोणी मागासला l
म्हणोनी बोलला देव माझा ll”
आपल्या अमूल्य अशा साहित्य सेवेने राष्ट्रसंतांनी समाजसेवेचे शिवधनुष्य आपल्या हाती घेतले आहे. या शिवधनुष्याला अभंग, भजने, पत्रे, भाषणे, सुविचार, ग्रामगीता, ई. साहित्यरुपी बाण समाजसुधरणेसाठी लावलेले आहेत. राष्ट्रसंतांच्या सहित्याचे तनमन एकत्र करून अध्ययन केल्यास सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलण्याचे सामर्थ्य अंगी येते. ही जबाबदारी आपण जनतेने उचलली पाहिजे, तरच आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होउन आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






