तुका म्हणे, शोभा सांगे….
संत तुकारामांनी स्वतः अध्यात्मात परमोच्च स्थिती प्राप्त करून घेतली होती. देवाची प्राप्ती झाल्यावरही देवाची भक्ती का करावी याचा आदर्श पाठ त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून घालून दिला होता. देवप्राप्ती नंतरही, अद्वैत स्थितीला प्राप्त होऊनही अत्यंत कृतज्ञतेने तुकाराम देवभक्ती करीत होते. अद्वैत भक्तीतील ही गौरवाची स्थिती आहे. संत तुकारामांचे असे वागणे म्हणजे त्यांच्या मस्तकावर शोभून दिसणारा पंचम पुरुषार्थ म्हणावा.
मुक्तीवरील भक्ती जाण l
अखंड मुखे नारायण ll
एका अंगी दोन्ही झाले हो निर्माण l
देवभक्त पणे स्वामी सेवा ll
संत तुकाराम महाराज म्हणतात की देव जसा मूर्तीत आहे तसा तो प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठिकाणी सुद्धा पहावा.
तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग l
तेची झाला अंगे तुका आता ll
म्हणून प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेल्या प्राणिमात्राची देखील पूजा व्हावी.
विश्वी विश्वंभर l
बोले वेदांताचे सार ll
हरि व्यापक सर्व्हगत l
हा तो मुख्यत्वे सिद्धांत ll
आणि याच्याही पलीकडे जाऊन देवाचे निर्गुण स्वरूप त्यांनी दाखविले आहे. परंतु ज्याचा जसा अधिकार आहे तशी त्याने भक्ती करावी असेही ते सांगतात. संत तुकारामांनी ज्याला जसा झेपेल तसा भक्तीचा मार्ग सांगितला आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे लोक येत असत. कर्म, उपासना, ज्ञान, ध्यान या अधिकारा प्रमाणे लोक येत असत.
“अधिकारी तैसा दावियेला मार्ग…”
हे सूत्र लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या उपदेशविषयक अभंगांचे अर्थ उलगडत जातात.
विषयभोगामध्ये रममाण झालेल्या निकृष्ट माणसास, ते सांगतात, अरे नरदेह दुर्मिळ आहे, नीतीने वाग. परद्रव्य, परनारी, यांची अभिलाषा धरू नकोस, नीतीने वागणाऱ्या आणि स्वर्गातील भोगाची इच्छा धरणाऱ्याला ते सांगतात, स्वर्गातील भोगाची इच्छा करू नकोस कारण स्वर्गभोग संपला की पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. वेदशास्त्री पंडितांनाआपल्या ज्ञानाचा गर्व न करता सर्वांशी समान वागा असे सांगतात. नाठाळ, ढोंगी, नास्तिक, दुष्ट यांच्याशी ते कठोर भाषेत बोलतात.अपरिपक्व व्यक्तीस कोणताही त्याग करण्यास ते सांगत नाहीत.
भगवंताने प्रत्येकास जी शक्ती दिली आहे त्याचा उत्तम प्रकारे प्रत्येकाने उपयोग करून जनलोकांचे कल्याण करावे अशी शिकवण तुकाराम महाराज देतात.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






