अभिजात भाषेचे मराठी लेणे…

SHARE:

ग्रामगिताचार्य, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. शोभा माधव गायकवाड यांची मराठी अभिजात भाषा दिनानिमित्य विशेष कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत..

धर्म मराठी…

सह्याद्रीच्या कड्यावर कोरलेले लेणे जसे अजरामर,
तसे आमची मराठी भाषा, अभिजात, तेजस्वी, सुंदर।

शब्दा शब्दात इथे संतांची विभूती सजली,
ज्ञानेशाची ओवी अन् तुक्याची गाथा गाजली।

शिवशंभूच्या तलवारीला धार हीच बोली देते,
महाराष्ट्राच्या मातीला अभिमानाची झळाळी देते।

शेकडो वर्षे तप करून ही भाषा घडली,
अमृताहुनी गोड, ही मायबोली अपुली।

अलंकार तिचे अभंग, शृंगार तिचा पोवाडा,
तिच्या पदराआड दडला इतिहासाचा गाडा।

ही फक्त भाषा नव्हे, हे संस्कृतीचे लेणे,
याच लेण्याने आम्हाला माणूस म्हणून घडवणे।

इंग्रजीच्या झगमगाटात या लेण्याला विसरू नका,
या दिव्य वारशाला काळोखात सोडू नका।

बोला मराठी, जगा मराठी, हाच एक ध्यास,
डॉ. शोभाजी सांगते, मराठीतच आहे खरा श्वास।

अभिजात मराठी, आमच्या गळ्यातील हार,
हाच आमचा अभिमान, हाच आमचा शृंगार।

हे लेणे जपूया, पुढच्या पिढीला देऊया,
मराठीच्या प्रकाशात अवघे विश्व उजळूया॥

 

ग्रामगीताचार्य –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा