टीव्ही वरील बातमी ऐकली, बातमी होती नाना आपल्याला सोडून गेले. थोडया वेळापूरत मन सुन्न पडलं.
मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली थाप उमटवणारे नाना आता आपल्यात राहिले नाही. खूप दुःख झालं, त्यासोबत आठवू लागला नानांचा इतिहास.
To be or not to be, that is the question….. जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे, या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लख्तर, गुलामीच्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहात आणि करावा सर्वांचा शेवट माझा, तुझा, ह्याचा आणि त्याचा सुद्धा, मृत्युच्या महासर्पानं असा डंख मारावा, नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा….अशा परखड भाषेतील नाना आणि त्यांच्यामुळे आता पोरके होणार हीच भीती मनात असतांना आठवले नानांचे ते विचार, माझा मृत्यू झाल्यानंतर रडत बसू नका. नानांचा क्रांतिवीर चित्रपट आला आणि अख्या देशाने त्या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलं आणि पुढे नट असणारे नानाजी आज आपल्यातून नटसम्राट होऊन निघून गेले.
मध्यंतरी नानांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या सोबत भेट झाली, त्यामध्ये नानांनी देवेंद्रजींना प्रश्न विचारला तो प्रश्न सत्ताधाऱ्यांना आता कोण विचारणार? हा प्रश्न माझ्या समोर उभा. तो प्रश्न होता, “देवेंद्रजी मतदार म्हणून तुमच्या नजरेत आमची काही किंमत आहे का?, त्यावर देवेंद्रजी सहजच उत्तरले, तुमचा शिवाय आमची किंमत कशी राहणार…, मात्र नानांनी त्यांना पुन्हा प्रश्न केला. अहो, देवेंद्रजी हे बोलण्यापुरतं…मात्र सत्यता काय? यामध्ये नानांची समाजाप्रती असलेली जागरूकता दिसून येते. नानांचे एक भाषण ऐकत असतांना त्यांनी त्यामध्ये शेतकऱ्यांना सांगितले की, सरकारकडे काही मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण जे माझ्या पोटात आहे ते लगेच ओठात येते. मला काढून टाकतील त्या पक्षातून, महिनाभरात सगळे पक्ष मी फिरून आलेला असेल. त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी कळणार यांना आपण मरणार आहोत. मृत्यू आहे, अटळ आहे, अमर असल्यासारखे का बोलता? पुढील पिढीला काय संस्कार देणार आपण?
असे नानांचे शब्द कानावर मोठा अविर्भाव दाखवून जातात. नाना म्हणायचे, मी मंदिरात केव्हाच जात नाही. याचा अर्थ असा नाही की, मी देवाला मानत नाही. मी देवाला मानतो. पण का बरं उगीचंच मंदिरात जाऊन देवाला त्रास द्यायचा, मानव जन्म दिला त्याने खूप झाले. असे शब्द आजही ऐकले की मन सुन्न पडते.
वर्ष 2026 खरंच आपल्या महाराष्ट्रासाठी दुखवट्याचं ठरताना दिसत आहे. कारण या वर्षात सुरुवातीला कामाचा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जायचं असे अजितदादा सोडून गेले, तर एप्रिल च्या मध्यंतरी आपल्या सुमधूर आवाजाने महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आशादीदी सोडून गेल्या, विजय मेहता, बी.टी. देशमुख, रत्नाकर महाजन, मदन वाफना आणि आता नानाजी.
चित्रपट सृष्टीतील व्यासपीठापासून ते नाम संस्थेमार्फत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारे नाना सदैव स्मरणात राहतील. शेवटी, जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.
शेवटी इतकंच लिहावं वाटते, आपणासारखे व्यक्तिमत्त्व देशाला लाभण्यासाठी तितकं पुण्य देशातील जनतेचं असून चालत नाही तर आपण जनतेप्रति दाखवलेला जिव्हाळा आणि दिलेला मदतीचा हात त्याहून अधिक महत्वाचा मला वाटतो. शेवटी, दररोज करावा सोहळा आपण, आपल्या अस्तित्वाचा. कारण, उद्या आपण नसल्याने जग थांबणार नाही. हे देखील तितकेच महत्वाचे.
नाना अश्रूपूर्ण श्रद्धांजली…!
लेखक –
चि. तन्मय ग. पुनसे
मु. पळसखेड, ता. चांदुर रेल्वे,
जि. अमरावती.
संपर्क – ७४९८९०८२३६
Author: तन्मय गणेश पुनसे
लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.






