युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा…

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

वारकऱ्यांचे प्रमुख दैवत ‘पंढरीचा राणा’ म्हणजेच ‘पांडुरंग’ अर्थातच ‘विठ्ठल वा विठोबा’. तो पंढरपुरात राहतो. परंतु कित्येक शतकांपासून तो विटेवर उभा आहे आणि त्याचे तेच रूप सर्वांनी मान्य केले आहे. त्याचा उत्पत्ती काळ नेमका कोणीच सांगत नाही.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
“पुंडलिकाच्या भावार्थ l गोकुळाहून जाता येते ll” 
सन नामदेव म्हणतात,
“पुंडलिका भावे बोलले ओरसे l नेणो काय कैसे प्रेम त्याचे ll
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“भक्तामाजी अग्रगण्य l पुंडलिक महामुनी ll 
त्याच्या प्रसादे तरले l जडजीव उद्धारिले l 
तोचि प्रसाद आम्हासी ll विटेवरी ऋषिकेशी ll”

संत तुकारामादी सर्वच संत श्रेष्ठांची अशी धारणा आहे की, संतपुंडलिकाच्या भक्तिप्रेमाला वश होऊन पांडुरंग पंढरपुरास विटेवर येऊन उभे राहिले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांनी आपापल्या अभंगात तसे नमूद केले आहे. वारकऱ्यांचे प्रमुख दैवत पंढरीचा राणा म्हणजेच पंढरपूरचा पांडुरंग आहे. वारकरी पंथाचा नाथपंथाशी जन्म जनक संबंध आहे. वारकरी हे नामाभिधान उत्तरकालीन आहे. वारकरी हा भागवत किंवा भक्ती संप्रदाय आहे. “वारकरी” हे नाव त्याला नंतर प्राप्त झाले असावे असे वाटते.

पौराणिक साक्षी – 
संत श्रेष्ठीच्या समजुतीबरोबरच काही पौराणिक साक्षीतून पांडुरंगाबद्दलचे उल्लेख आढळतात. म्हणजे पांडुरंग हे दैवत खूप पुरातन आहे. पद्म पुराणात पांडुरंग व पुंडलिक मुनी ह्यांचा उल्लेख आढळतो. ह्याशिवाय गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण, भार्गव पुराण इत्यादी पुराणातूनही पांडुरंगाचा आलेख आहेच. म्हणून पांडुरंग हे अतिशय प्राचीन दैवत आहे असे निश्चितच म्हणता येत.

आचार्यांची साक्ष –
आद्य शंकराचार्यांनी ‘पांडुरंग’ ह्या दैवताचे स्तवन करणारे  ‘पांडुरंगाष्टक’ नावाचे स्तोत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम’ असे पांडुरंगाला भक्तिपूर्वक नमन केले आहे. हा आठव्या शतकातील काळ असल्याने त्यावेळच्या लोकांना पांडुरंग हे दैवत माहीत होते असे मानता येते.

ऐतिहासिक अथवा शिलालेखीय पुरावे – 
मराठी विश्वकोश खंड 13 मध्ये असा उल्लेख आहे की शीला लेखीय पुरावा हा ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय मानला जातो. पंढरपूर अथवा पांडुरंगाचा उल्लेख असलेले काही शिलालेख उपलब्ध झालेले आहेत.

1. पंढरपूरचा चौऱ्यांशीचा शिलालेख – हा. शिलालेख 1195 चा असून त्यात विठ्ठल ही नाव आलेले आहेत.

2. पंढरपूरच्या देवळातील सोलाखांबीचा शिलालेख – हा शिलालेख 1295 वा असून सोळा खांबीच्या वरच्या बाजूला आहे.

3. आळंदी येथील हरिहरेंद्र स्वामींच्या मठातील शिलालेख.

4. फादर दलरी ह्यांनी कोल्हापूर येथे सापडलेल्या  ताम्रपटाचा आधार घेऊन पंढरपूरचा सर्वात जुना उल्लेख सन 516 (शके 438) मध्ये सापडतो ही सिद्ध केले आहे.

संत वांड्मयातील पांडुरंगा विषयी उल्लेख – 
संत ज्ञानेश्वर – 
“हे नव्हे आजिकालीचे ! युगे अठ्ठावीसाचे !!”
संत नामदेव – 
“युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ! वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा !!”
संत एकनाथ – 
“अठ्ठावीस युगे झाली ! अद्यापि न बसे खाली !!”
संत तुकाराम – 
“युगे झाली अठ्ठावीस ! अजुनी न म्हणशील बैस !!”

     प्रत्येक संतांनी युगे हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच पांडुरंग अठ्ठावीस युगांपासून पंढरपूर येथे आहे असे म्हणता  येईल. एकूणच काय तर संतांचेच नव्हे तर सर्वांचेच पंढरपूर हे वैकुठ पीठ आहे. संत तुकाराम महाराज दर एकादशीला पांडुरंगाचे कीर्तन करीत असत. कीर्तनाची सुरुवात त्यांनी आपल्या घरी असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात एकादशीपासूनच केली. हरिनामाच्या भक्तिमय रस पानात ते सदैव एकांतात बुडालेले असत. ते सर्वांना सांगत असत.
“नामसंकीर्तन साधन पै सोपे l जळतील पापे जन्मातरीची ll”
सामन्यातून सामान्य व्यक्तीला भगवंतापर्यंत पोचण्याचा एक सोपा मार्ग त्यांनी दाखवून दिला.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
“पैल आले हरी, शंखचक्र शोभे करी ll 
मुगुट कुंडलांच्या दिप्ती, तेजे लोपला गवस्थी ll
तुका झालासे संतुष्ट, घर आले वैकुंठ पीठ ll”
पांडुरंग मुखाचे सुख नाही त्रिभुवनी, असे मानणारे तुकाराम होते.
अशा ह्या पांडुरंगाने संत तुकारामांना भक्तीचे वेड लावले. तुकारामांनी हे वेड आनंदाने स्वीकारले.

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा