नागपूर : निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि लोकशाहीच्या संविधानात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवर होत असलेल्या कथित आक्रमणाविरोधात आज नागपुरात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीने एक भव्य आणि तीव्र संयुक्त मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि कम्युनिस्ट पार्टी (भाकप/माकप) यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता नागपुरातील ऐतिहासिक व्हेरायटी चौक येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून या संयुक्त मोर्चाची उत्साही आणि आक्रमक वातावरणात सुरुवात झाली. हातात पक्षाचे झेंडे, फलक आणि घोषणा देत हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.


मोर्चा व्हेरायटी चौकापासून निघून प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे धडकला. संपूर्ण मार्गावर केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे नागपुरात काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि आंदोलनाचा मुख्य उद्देश
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धती आणि भूमिकेविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते. लोकशाहीचे जतन करणे, निवडणूक आयोगाची पारदर्शकता टिकवणे आणि नागरिकांच्या मताधिकार सुरक्षित ठेवणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे नेत्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. केंद्र सरकार लोकशाही मूल्यांना बगल देत असल्याचा गंभीर आरोप यावेळी नेत्यांनी केला. तसेच, देशातील निष्पक्ष यंत्रणांवर दबाव आणला जात असल्याचा दावा करत तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.



जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकन्या आधीच मोर्चाचे रूपांतर आक्रमक झाल्यामुळे काही अंतरावरच मोर्चाला रोखण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर आणि आक्रमक निवेदन सुपूर्द केले. या निवेदनात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणी राष्ट्रपती व निवडणूक आयोगाकडे करण्याबाबतचा आग्रह धरण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून ते योग्य त्या वरिष्ठांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, प्रफुल गुडधे, अश्विन बैस, सलील देशमुख, प्रिया फुके, ॲड. अपूर्वा पित्तलवार, संजय भिलकर, जयंत दळवी, धनराज वलुकार, चेतन शिराळकर समवेत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






