स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, हगनदारी मुक्त ग्राम..

SHARE:

भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी व स्वच्छतेसाठी ‘हागणदारी मुक्त ग्राम योजना’ ही योजना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राबविली जाते. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देऊन उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा पूर्णपणे बंद करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा ‘हागणदारीमुक्त ग्राम’ हा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

 

‘हागणदारी मुक्त ग्राम’

हागणदारीत ।
प्रभातला दूर ।।
ग्राम नारी नर ।
बसताती ।।१।।

उजाडण्यापूर्वी ।
तम चिरतच ।।
उघड्यावरच ।
शौचाचार ।।२।।

माशा घोंगावत ।
येती दारोदार ।।
रोग घरोघर ।
पसरती ।।३।।

ग्राम जागवारे ।
ग्राम स्वच्छ करा ।।
लाऊनिया नारा ।
स्वच्छतेचा ।।४।।

हागणदारी ही ।
मुक्त ग्रामातून ।।
अंगणी बांधून ।
शौचकूप ।।५।।

गोदरी शौचास ।
जाऊ नये कोणी ।।
प्रभाती रंगणी ।
शौचालयी ।।६।।

रोग जाई दूर ।
स्वच्छता ग्रामात ।।
सर्व आनंदात ।
घरोघरी ।।७।।

गाडगेबाबांचा ।
स्वच्छता संदेश ।।
स्वच्छ करू देश ।
भारतीय ।।८।।

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय संत कबीर कवीराज
पुरस्कार प्राप्त अभंगकार, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९

 

(‘अभंग तरंग’ या प्रा. अरुण बुंदेले यांच्या काव्यसंग्रहातून साभार.)

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा