आम्हा घरी, धन शब्दांचीच रत्ने…

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या घरी लौकिक धन म्हणजेच सोने ,चांदी, पैसे, रोकड, असे काही नाही. परंतु आमच्या अभंगातील शब्द हेच धन रत्नाच्या मोलाचे आहेत. हे शब्दच आमची शास्त्रे आहेत. त्यांचा आम्ही उपयोग करतो. हे शब्दच आमच्या जीवाचे जीवन आहे आणि ह्या शब्दाने आम्ही जगातील लोकांना ज्ञान, भक्ति वगैरेचे धन वाटतो. शब्दच आमचा देव आहे आणि शब्दांनीच आम्ही देवाचे गौरव करून पूजा करतो. शब्दांची पूजा बांधणाऱ्या, शब्द श्रीमंत तुकारामांची गाथा म्हणजे सर्वोत्तम-शब्द, शब्द-रचना, दृष्टांत, उपमा, विविध अलंकार, विविध विषयांनी भरलेला अथांग सागरच आहे.

तुकारामांच्या गाथेचे स्वरूप –
संत तुकारामांची अभंगरचना सुमारे साडेचार हजार आहे. अनेक विद्वानांनी अभंगांचे वर्गीकरण करून त्या अभंगांद्वारे संत तुकारामांचा जीवनपट उलगडण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे.

बाळ क्रीडेचे अभंग –
तुकाराम महाराज हे स्वतः वारकरी पंथाचे असल्याने त्यांचे संपूर्ण अभंग त्यांचे उपास्य दैवत म्हणजेच पांडुरंगावर आधारित आहेत. या पांडुरंगावर म्हणजेच त्यांच्या उपास्य दैवतावरच त्यांनी बाळ क्रीडचे अभंग रचलेले आहेत. जे अभंग त्यांचे प्राथमिक अभंग असावेत.
देवा आदीदेवा जगत्रय जीवा l
परियेसी केशवा विनंती माझी ll 
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम l
ऐसे देई प्रेम काही कळा ll 
ह्या अभंगाची रचना ओवीबद्ध तसेच अभंगयुक्त ही आहे.

रूपके आणि गौळणी –
बाळ क्रीडेच्या अभंगाच्या रचनेनंतर त्यांनी एकनाथाप्रमाणे किंवा त्याच वळणावर काही आध्यात्मिक रूपके तसेच गौळणीही रचल्या.
उदा.
हरिनाम वेली विस्तार पावली l
फळी पुष्पीभार वोल्हाविली ll
तेथे माझ्या मना होई पक्षीराज l
साधावया काज तृप्तीचे या ll
मुळीचिये बीजे दाखविली गोडी l
लवकर जोडी जालियाची ll 
तुका म्हणे क्षणाक्षणा जाते काळ l
गोडी ते रसाळ अंतरेल ll
या अभंगात तुकारामांची कल्पना शक्ती बहरून आलेली आहे. याचे मनोहरी दर्शन घडते. हरिनामावर वेलीचा हा रूपकात्मक अभंग आहे. आंधळा, पांगळा, खळ, वासुदेव, योगी असे रूपकांचे अनेक अभंग आहेत.
कोणी एक भुलली नारी l
विकिता गोरस म्हणे, घ्या हरी ll
देखिला डोळा बैसला मनी l
तोचि वदनी उच्चारी ll
आपुलियाचा विसर भोळा l
गोविंदा कळा कौतुक ll 
तुका म्हणे हसे जन l
नाही कान ते ठायी ll
  “गाई गोपाळ यमुनेच्या तटी” या गौळणीची रचना त्यांनी केली आहे. यात श्रीकृष्णाच्या बाळ क्रीडेचे  कौतुक तर आहेच. पण या निमित्ताने सुंदर बोधही केलेला आहे.

संत तुकारामांच्याअभंग गाथेत विविध विषयांवर अभंग
संत तुकारामांच्या अभंग गाथेत अनेक विषयांवर अभंग आहेत. साधक अवस्था, सिद्ध अवस्था, संत, पंढरी, नामसंकीर्तन, भक्ती, उपदेशपर, निरनिराळ्या आरत्या, रूपके, भूपाळ्या, देवचे दर्शन, परमेश्वरा संबंधी उत्कंठा आणि तळमळ, साक्षात्कार झाल्यानंतरच समाधान, सगुण आणि निर्गुण उपासना असे अनेक विषय आढळतात.
आपल्या आयुष्यातील पारमार्थिक अवस्था ते अभंगाद्वारे उघड करून सांगतात. साधकावस्थेतून सिध्दावस्थे पर्यंत ते कसे पोचले. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव. या सर्व प्रसंगाच्या चित्रपटाचा लेखाजोखा गाथा वाचत असताना डोळ्यासमोर उभा राहतो. तुकारामांचे सारे अभंग अनुभवाने व उपदेशाने भरलेले आहेत.
अभंग गाथेतून मानवी प्रतिभेची उत्तुंग झेप दिसून येते. आत्मनिवेदनाचे अमोघ साधन म्हणून शब्दांस त्यांनी धन, शस्त्र आणि देव मानले. आणि तसेच ते जीवनभर वागले.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l
शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ll 
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन l
शब्दे वाटू धन जनलोका ll 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव l
शब्देचि गौरव पूजा करू ll

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.

 

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा