अंबा माते तू आदी माया (अभंग/कविता)….

SHARE:

 

शारदीय नवरात्री उत्सव निमित्य प्रसिद्ध साहित्यिक तथा अभंगकार डॉ. शोभा गायकवाड यांचा प्रसिद्ध अभंग/कविता येथे वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत…

अंबा माते

अंबा माते तू आदि माया, तुझी किमया अपरंपार l
तुझ्या पायी नतमस्तक, करते शोभाजी नमस्कार  ॥१॥

नवरात्रीत तुझा गजर, घुमे अवघा आसमंत l
नवदुर्गा तू रणरागिणी, दुष्टांचा करी अंत ॥२॥

कमळावरी तू विराजते, हाती त्रिशूळ शोभे l
दिव्य तेज तुझ्या मुखी, पाहता सौख्य उभे ॥३॥

तूच लक्ष्मी तूच सरस्वती, तूच कालीका माता l
तुझ्या कृपेने उजळती, माझ्या घराच्या वाटा ॥४॥

जगतातील सर्व नारी, तुझ्याच रूपाच्या छाया l
त्या गृहकर्तव्य दक्ष, देई सर्वांना तुझी माया ॥५॥

थकल्या जीवाला तूच देतेस, नव चैतन्याची उभारी l
शोभाजी म्हणे देवी माझे, सर्व दुःख निवारी ॥६॥

झेंडूच्या माळा, कमळफुले, दिव्यांची आरास l
तुझ्या दारी आले मी माते, सरो भवरूपी त्रास ॥७॥

अमरावतीची मी लेक शोभा, तुझ्या भक्तीत रंगली l
तुझ्या नामाचा गजर करता, वाणी मला स्फुरली ॥८॥

अंबे तुझा जयजयकार, करी अवघे त्रिभुवन l
तुझ्या आशीर्वादाने माते, पावन होई जीवन ॥९॥

शोभाजी म्हणे अंबा माते, होते तुझ्या चरणी  लीन l
तुझ्या चरणीच  माते, माझे सर्वस्व अर्पण करीन ॥१०॥

॥ अंबा माता की जय ॥

 

ग्रामगीताचार्य –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा