पुणे : जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘सोमेश्वर‘ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सर्व २१ उमेदवारांनी विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पॅनलला सभासदांनी पूर्णपणे नाकारले असून जगताप यांच्यासह त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
माळेगाव येथे मतमोजणी; सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी
माळेगाव येथील मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण ९३ टेबलांवर ४५० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
‘ब’ वर्ग मतदारसंघातून विजयाचे श्रीगणेश : मतमोजणीच्या सुरुवातीलाच ‘ब’ वर्गातील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार संग्राम सोरटे विजयी झाले आणि कार्यकर्त्यांनी पहिला जल्लोष केला. त्यानंतर निंबूत-खंडाळा तसेच इतर सर्व गटांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी सातत्याने मोठी आघाडी टिकवून ठेवली.
विरोधी गटाचे प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांना ६,४९० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले सुनेत्रा पवार गटाचे विक्रम भोसले यांनी १३,८५४ मते घेत तब्बल ७,३०० हून अधिक मतांच्या फरकाने मोठा विजय नोंदवला.
विजयी उमेदवारांची यादी (प्रमुख चेहरे)
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील विजयी झालेल्या २१ संचालकांमध्ये प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये राजेंद्र जगताप (तालुकाध्यक्ष), सतीश खोमणे (पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष), दत्ताआबा चव्हाण (माजी बांधकाम सभापती), संग्राम सोरटे (‘ब’ वर्ग मतदारसंघ), प्रमोद काकडे, अभिजित काकडे, वसंतराव दगडे, राजवर्धन शिंदे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. त्याचबरोबर परत एकदा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.
सहकार क्षेत्रात अजित दादांच्या योगदानानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक पार पडली. विरोधकांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले असले, तरी सभासदांनी सुनेत्रा पवारांच्या आश्वासनांवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. सोबतच पक्षातील अंतर्गत असंतोष व बंडखोरी मोडून काढण्यात सुनेत्रा पवार यशस्वी ठरल्या आहेत. यामुळे बारामती व परिसरातील सहकार संस्थांवर पवार कुटुंबाचे असणारे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
बारामतीत कार्यकर्त्यांचा गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष
निकाल स्पष्ट होताच सोमेश्वरनगर, बारामती आणि आसपासच्या परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. विजयी उमेदवारांचे पेढे भरवून कौतुक करण्यात आले. “हा विजय सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीचा आणि सुनेत्रा वहिनींच्या कुशल नेतृत्वाचा आहे. सभासदांनी दिलेल्या या कौलामुळे कारखान्याचा विकास आणखी वेगाने होईल.” असे मत विजयी उमेदवारांनी व्यक्त केले. या ऐतिहासिक विजयामुळे बारामती आणि पुणे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






