३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण होणारच; “अभी नही तो कभी नही” – विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वज्रनिर्धार!

SHARE:

नागपूर : “विदर्भातील जनतेला अन्याय आणि उपेक्षेच्या दरितून बाहेर काढण्यासाठी तसेच स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी आता निर्णायक लढा उभारण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण होणारच, ‘अभी नही तो कभी नही’.” असा ठाम आणि आक्रमक निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) कोअर कमिटी बैठकीत व पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त करण्यात आला.

दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व वर्किंग कमिटीच्या प्रमुख उपस्थितीत कोअर कमिटी, सर्व जिल्हा अध्यक्ष, समन्वयक, महिला व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ‘मिशन २०२७’ अंतर्गत आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यात आली आहे.

विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावे आणि ‘हल्लाबोल आंदोलन’
विदर्भातील सर्व ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमधील घराघरांत विदर्भ राज्याच्या मागणीची धग पोहोचवण्यासाठी विराआंसच्या वतीने “विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावे” आयोजित करण्यात येणार आहेत.

मेळाव्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे:
२६ ऑक्टोबर २०२६ : प्रमिलाताई ओक सभागृह, अकोला
२ नोव्हेंबर २०२६ : जिजाऊ गार्डन, चंद्रपूर
२५ नोव्हेंबर २०२६ : रोजी यवतमाळ

याशिवाय, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात भव्य ‘हल्लाबोल आंदोलन’ छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. या सर्व आंदोलनांत विदर्भातील सर्व नागरिक, युवा आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर कराराचा विश्वासघात आणि ऐतिहासिक अनुशेष
पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. वामनराव चटप विदर्भावर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाचा पाढा वाचला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारावर विश्वास ठेवून विदर्भ १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रात सामील झाला. परंतु, घटनेतील ३७१ (२) कलम जोडून वैधानिक विकास मंडळ स्थापन करूनही लोकसंख्येच्या आधारावर मिळणारा २३ टक्के सिंचन निधी विदर्भाला मिळालाच नाही. सोबतच गेल्या ३८ वर्षांत सिंचनाचा निधी न मिळाल्यामुळे विदर्भातील १३१ धरणांचे काम अपूर्ण राहिले व १४ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकली नाही. परिणामी, वऱ्हाड व गांधी बापूंच्या वर्धा जिल्ह्यात गेल्या २१ वर्षांत ४८ हजार शेतकऱ्यांनी कर्जापायी व दुष्काळामुळे आत्महत्या केल्या.

उद्योग, ऊर्जा, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, ग्रामविकास, आदिवासी विकास व सामाजिक न्याय या विभागांचे सुमारे १५ हजार कोटी रुपये कमी मिळाल्यामुळे विदर्भात कुपोषण, प्रदूषण, रोजगाराच्या संधी अभावी नक्षलवाद आणि तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना चटप यांनी सांगितले की, आज राज्यावर ९ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून त्याच्या व्याजाचा बोजा ६४ हजार ६६९ कोटी रुपये आहे. तसेच कंत्राटदारांचे थकीत ८६ हजार ६६२ कोटी आणि कर्जमुक्तीची रक्कम ३६ हजार ५८५ कोटी रुपये आहे. एकूण ११ लाख २४ हजार ९०६ कोटी रुपयांची परतफेेड व देणी महाराष्ट्रावर आहेत. अशा स्थितीत विदर्भ आणखी १०० वर्षे महाराष्ट्रात राहिला तरी विदर्भाचा ६० हजार कोटींचा सिंचन व इतर क्षेत्रातील १५ हजार कोटींचा अनुशेष कधीही भरून निघू शकत नाही, म्हणूनच ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हाच एकमेव पर्याय आहे.

बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला व पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडी अध्यक्ष प्रा. मंजुषाताई तिरपुडे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव वानखेडे, प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते, डॉ. रमेश कुमार गजबे, डॉ. प्रा. पदाताई राजपूत, शंकरराव पारे, गजानन अहमदाबादकर, तुषार हांडे, नरेश निमजे, कृष्णाजी भोंगाडे, राजेंद्रसिंह ठाकूर, संजय केवट, राजेंद्र आगरकर, मधुसूदन हरणे, अशोक पोरेड्डीवार, बाळकृष्ण सावसागडे, अतुल सतदेवे, वसंतराव गवळी, ज्योतीताई खांडेकर, वीणा भोयर, सुनील पोरेड्डीवार, मुकेश मेश्राम, देविदास लांजेवार, विजय नवखरे, मारोतराव बोथले, दिलीप गौतम, श्रीकांत दौलतकार, संजय चौधरी, आशिष कुमार चव्हाण, गुलाबराव धांडे, नीलकंठराव यावलकर, सुरेशराव भोंगाडे, भोजराज सरोदे, धोंडबाजी गावंडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा