दृष्टिबाधित कवींच्या प्रतिभेसाठी नागपुरात देशातील पहिले राष्ट्रीय व्यासपीठ : नागपुरात २२ नोव्हेंबरला ‘काव्यदृष्टी २०२६’ अखिल भारतीय कवी संमेलन

SHARE:

नागपूर : दृष्टिबाधित व्यक्तींच्या स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठेचा संदेश देणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पांढरी काठी दिना’च्या निमित्ताने नागपुरात एक ऐतिहासिक उपक्रम साकारत आहे. दृष्टिबाधित कवींचे पहिले राष्ट्रीय कवी संमेलन ‘काव्यदृष्टी २०२६’ चे आयोजन येत्या २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४-एच१, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द इंटिग्रेशन ऑफ द ब्लाइंड (एनआयओबी – NOIB) आणि लायन्स क्लब नागपूर क्लासिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या कवी संमेलनात देशभरातील १० नामवंत दृष्टिबाधित कवी सहभागी होणार असून, सुमारे २,००० रसिकांच्या उपस्थितीत ते आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करतील. या उपक्रमाची अधिकृत घोषणा नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

प्रतिभेचा आणि क्षमतेचा सन्मान
दृष्टिबाधित व्यक्तींकडे केवळ त्यांच्या शारीरिक मर्यादांच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांच्यातील प्रतिभा, कल्पकता आणि क्षमतेचा सन्मान व्हावा, हा ‘काव्यदृष्टी २०२६’ चा मुख्य उद्देश आहे. कविता हे भावविश्व व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असून, या संमेलनातून दृष्टिबाधित कवींचे अनुभव आणि विचार व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दृष्टिबाधितांसाठी उभं राहणार ‘सक्षमीकरण आणि प्रशिक्षण केंद्र’
या कवी संमेलनातून जमा होणारा निधी एनआयओबी (NOIB) च्या माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समर्पित ‘सक्षमीकरण आणि प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी बीजभांडवल (Seed Capital) म्हणून वापरला जाणार आहे.
या केंद्राद्वारे दृष्टीबाधितांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. डिजिटल साक्षरता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाची (Assistive Technology) उपलब्धता करून दिली जाईल. रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून दृष्टिबाधितांना स्वावलंबी बनवले जाईल.
दृष्टिबाधितांना केवळ मदत देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना स्वतःच्या क्षमतेच्या बळावर सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

“डोळ्यांचे अंधत्व आत्म्याची दृष्टी अंधुक करू शकत नाही” – डॉ. विनोद असुदानी
एनआयओबी (NOIB) चे संस्थापक आणि भारतातील पहिले दृष्टीबाधित साहित्य कला अकादमी पुरस्काराने सन्मानित व्यक्ती डॉ. विनोद असुदानी म्हणाले, “डोळ्यांचे अंधत्व आत्म्याची दृष्टी अंधुक करू शकत नाही. भारतातील दृष्टिबाधित कवींचा आवाज संपूर्ण देशाने ऐकला पाहिजे. ‘काव्यदृष्टी २०२६’ हे त्या आवाजाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माध्यम आहे. आम्ही केवळ धर्मादाय संस्था उभारत नसून, दृष्टिबाधित व्यक्तींच्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवणारी व्यवस्था निर्माण करत आहोत.”
जन्मतः दृष्टिबाधित असलेल्या डॉ. असुदानी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले व साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच ते देशातील पहिले असे दृष्टीबाधित व्यक्ती आहे ज्यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सामाजिक जबाबदारी आणि लायन्स क्लबचा सहभाग
लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४-एच१ चे जिल्हा गव्हर्नर विलास साखरे यांनी स्पष्ट केले की, दृष्टिबाधितांच्या प्रश्नांकडे केवळ एका विशिष्ट समाजाची समस्या म्हणून न पाहता ती संपूर्ण समाजाची जबाबदारी मानली पाहिजे. लायन्स इंटरनॅशनल ही जागतिक स्तरावर कार्यरत सेवाभावी संस्था असून दृष्टि रक्षण आणि दृष्टिबाधितांना मदत करणे हे तिचे प्रमुख ध्येय आहे. या उपक्रमासाठी विदर्भातील १२५ हून अधिक लायन्स क्लब आणि हजारो सदस्य एकत्र आले आहेत.

मान्यवरांची उपस्थिती आणि नागपूरकरांना आवाहन
या ऐतिहासिक व सामाजिक उपक्रमाला राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मिळत आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार आणि नागरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. नागपूर व विदर्भातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दृष्टिबाधित कवींच्या प्रतिभेला दाद द्यावी व या सक्षमीकरणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रम आणि पासची माहिती :
दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं. ६:०० वाजता, सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाकरिता प्रवेशिका / देणगीदार पास म्हणून ₹५,००० (आश्रयदाता), ₹२,००० (प्राधान्य) आणि ₹१,००० (सर्वसाधारण). सिटीप्लस ३६०.कॉम/इव्हेंट्स (Cityplus360.com/events), बुक माय शो (BookMyShow), आणि डिस्ट्रिक्ट लायन्स ॲपवर पासेस उपलब्ध राहितील. दृष्टीबाधितांच्या या अतुलनीय कार्यात आपले योगदान देऊन सहकार्य करावे ही विनंती.

अधिक माहिती करिता खालील क्रमांकावर संपर्क –
९३७३१०६११४, ९९६०३६८२४९,
९४२३१२३१५५, ९५०३१५४४३९

पत्रकार परिषदेस जिल्हा गव्हर्नर लायन विलास साखरे, डॉ. विनोद असुदानी, लायन डॉ. अरुण चतुर्वेदी (प्रथम उपजिल्हा गव्हर्नर), एलएन निशिकांत प्रतापे, लायन डॉ. विनोद जयस्वाल, कॅबिनेट सेक्रेटरी लायन नितीन लोणकर, लायन विवेक चिब आणि लायन्स क्लब नागपूर क्लासिकचे अध्यक्ष व्यंकटेश कृष्णमूर्ती उपस्थित होते. लायन्स क्लब नागपूर क्लासिकचे सचिव एलएन श्वेतांक गुप्ता यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले..

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा