नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाच्या वतीने संविधान चौक, नागपूर येथे दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी पार पडले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
प्रमुख मागण्या आणि आंदोलनाची पार्श्वभूमी :
१. वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी फेब्रुवारी २०२५ पासून नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाची देयके विनाकारण रोखून धरली आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कोषागार अधिकाऱ्यांनी कोणताच सकारात्मक निर्णय न घेता आडमुठेपणाचे धोरण अवलंबल्याचा तीव्र निषेध या आंदोलनात करण्यात आला.
२. महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी ‘समान काम, समान वेतन’ या न्यायानुसार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ मिळावी यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला आणि संप पुकारण्याच्या इशाऱ्याला महासंघाच्या वतीने सविस्तर पाठिंबा दर्शविला आहे.

शांतता पूर्ण धरणे आंदोलन –
सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत संविधान चौक येथे आयोजित धरणे आंदोलनादरम्यान पूर्णपणे शांतता राखण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाच्या निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिव, नागपूर चे पोलीस आयुक्त यांच्याकडे नमूद अर्जाच्या प्रतिलिपी पाठविण्यात आली असून, लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






