नागपूर : नागपुरमधील ‘पदवीधर महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ आणि ‘संचिता अर्बन निधी लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ठेवीदारांची तब्बल २ कोटी ११ लाख ६३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्रस्त ग्राहकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संस्थाचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी संस्थांमधील १६ ग्राहकांच्या मुदत ठेवींची (Fixed Deposits) मुदत पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी आपली मूळ रक्कम परत मागितली. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. ग्राहकांनी वारंवार कार्यालयात फेऱ्या मारल्या असता, संस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे कार्यालय सोडून लापत्ता (पळून) असल्याचे समजले. इतर अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
अभिलेखामध्ये तफावत आणि अफरातफरचा संशय
पिडितांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन उपलब्ध अभिलेखाची पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही तक्रारदारांच्या मुदत ठेवींची नोंद संस्थेच्या दप्तरी आढळली नाही.
संस्थेने रक्कम स्वीकारून मुदत ठेव पावती दिली असताना, काही ठेवींच्या नोंदी अधिकृत अभिलेखात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे पती-पत्नी असून, त्यांच्या भूमिकेवर, आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणावर व ठेवी स्वीकारण्याच्या पद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
पोलिसांत तक्रार, तरीही कारवाई नाही
या सर्व गंभीर प्रकाराबाबत पीडित ठेवीदारांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या दिवाळीचा सण जवळ आल्याने ठेवीदारांना पैशांची तीव्र गरज भासत असून, न्याय मिळवून देण्याची व आपली कष्टाची रक्कम परत मिळवून देण्याची आर्त हाक त्यांनी दिली आहे.
तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून इतरसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळावी, अशी मागणी सूर्यकांत उद्धवप्रसाद शुक्ला, नितीन घरडे, भगतवत पांडे, सुनील घाटे, सौरभ शुक्ला यांच्यासह सर्व बाधित ठेवीदारांनी केली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.





