एच.डी.एफ.सी. बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई! सोमवारी शेअरवर राहणार नजर, नक्की प्रकरण काय?

SHARE:

खासगी क्षेत्र – खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर सोमवारी गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकिंग नियमन कायद्याच्या (Banking Regulation Act) काही नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल एचडीएफसी बँकेवर ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हा दंड खासगी क्षेत्रातील बँकेवर केवायसी (KYC) संबंधित कायदेशीर आणि नियामक दायित्वांमधील त्रुटींसाठी लावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय, हा दंड बँकेवर बँकिंग नियमन कायद्याच्या काही नियमांचे उल्लंघन करणं, कर्जावरील व्याजदराशी संबंधित अटींचं पालन न करणं, वित्तीय सेवांसाठी जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं तसेच केवायसीशी संबंधित काही निर्देशांचं पालन न केल्यामुळे लावण्यात आला आहे.

तपासानंतर निर्णय

रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की, ३१ मार्च २०२४ पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीनुसार बँकेचे देखरेख मूल्यांकन करण्यासाठी वैधानिक तपासणी करण्यात आली होती. या संदर्भात बँकेला रिझर्व्ह बँकेकडून एक नोटीस जारी करण्यात आली होती. बँकेचं उत्तर आणि त्यांनी पुरवलेल्या अतिरिक्त माहितीवर विचार केल्यानंतर, रिझर्व्ह बँकेला आढळलं की बँकेविरुद्धचे आरोप योग्य होते, ज्यासाठी आर्थिक दंड लावणं आवश्यक होतं.

शेअरची स्थिती काय?

एचडीएफसी बँकेच्या शेअरबद्दल बोलायचं झाल्यास, तो शुक्रवारी किरकोळ घसरणीसह १००७ रुपयांवर बंद झाला. या शेअरची ट्रेडिंग रेंज १०१२ रुपये ते १००४ रुपये दरम्यान राहिली. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी शेअर १,०२०.३५ रुपयांवर होता, जो शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी २०२५ मध्ये शेअर ८१२.१३ रुपयांवर होता.

आरबीआयनं ५६७३ जुनी परिपत्रकं रद्द केली
रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की, सुमारे सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर एकूण ५,६७३ जुनी आणि आता इरेलिवंट झालेली परिपत्रकं पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, ३,८०० हून अधिक अजूनही रिलिवंट परिपत्रकांना विविध विभागांमध्ये विभागून २४४ मास्टर निर्देश तयार करण्यात आले आहेत. आता कोणत्याही बँक किंवा नियंत्रित संस्थेला नियमांचं पालन करण्यासाठी केवळ त्यांच्या कामाशी संबंधित मास्टर निर्देश पाहावे लागतील. एकूणच, ९,४४६ परिपत्रके एकतर मास्टर निर्देशांमध्ये समाविष्ट केली गेली आहेत किंवा त्यांना रद्द करण्यात आलं आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Leave a Comment

अधिक वाचा