
नागपूर – मी माझ्या पगारावर समाधानी आहे. आज महाराष्ट्रात लाखो रुपयांची नोटांचे बंडलचे दोन प्रकरण गाजत असताना एका अधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर लावलेली पाटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पाटी लावली आहे नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत अतिरिक्त महसूल आयुक्त राजेश खवले यांनी. खवले यांनी त्यांच्या कार्यालयातील टेबलावर त्यांच्या नेमप्लेटसह “मी माझ्या पगारावर समाधानी” असल्याचे लिहिले आहे. माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र माझं कार्यक्षेत्र विदर्भातील अनेक जिल्ह्यात विस्तारलेलं असून ग्रामीण भागातील अनेक लोक कामानिमित्ताने भेटायला येतात. त्यांना माझ्या कार्यपद्धतीचा सुस्पष्ट संदेश मिळावा, यासाठी ही पाटी लावल्याचे खवले म्हणाले.
देशातील नोकरशाही जर अशा पद्धतीने वागायला लागली तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाईल
दरम्यान, आज सकाळपासून राज्यात राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे संकेत देणारे दोन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये खवले यांनी लावलेली त्यांच्या टेबलावरील पाटी एक आशादायक चित्र दाखवणारी आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी ही अत्यंत चांगली बाब आहे, या देशातील नोकरशाही जर अशा पद्धतीने वागायला लागली तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाईल. असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या वेतनावर समाधानी राहिलेच पाहिजे. कारण सातव्या वेतन आयोगानंतर सर्वांना खूप चांगला पगार मिळतो आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. असेही कृपाल तुमाने म्हणाले.





