विधानभवन परिसरातील आव्हाड-पडळकर हाणामारीचा, अहवाल आता सभागृहात मांडला जाणार…

SHARE:

मुंबई – राज्यात विधान भवनाच्या परिसरात, पडळकर आव्हाड समर्थकांची हाणामारी झाली होती, त्या आव्हाड-पडळकर समर्थकांमधील हाणामारीचा अहवाल आता सभागृहात मांडला जाणार आहे. दोघांवरही कारवाई होणार आहे. गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि नंतर हाणामारीची घटना घडली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
पावसाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाणार आहे. विधानभवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून हा अहवाल विधानसभा अध्यक्षाकडे सादर केला जाणार आह गुरूवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे.
विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून या प्रकरणी आतापर्यंत ७  ते ८  बैठका झाल्या असून समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यातील संबधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी, यावर समितीतील सर्वांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
गेल्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या परिसरामध्येच हाणामारी झाली होती. पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले आणि जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये ही हाणामारी झाली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका सुरू केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या परिसरातच ’मंगळसूत्र चोर’ अशी घोषणा दिली. एकमेकांवरील टीकेचे रुपांतर नंतर वादात झाले.
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल तयार झाला असून हा अहवाल गुरुवारी सभागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे. समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर किंवा स्वतः त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर पडळकर-आव्हाडांकडून सभागृहात खेद व्यक्त करण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर विधानसभा अध्यक्षांनी समज दिली होती. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा, अशा सूचना विधानसभेत दिल्या होत्या. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे देखील नार्वेकर यांनी सांगितले होते. विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद बाळगत करत दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही या प्रकरणात आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित हाणामारीचा अहचाल सभागृहात मांडण्यात येणार आहे, व त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment

अधिक वाचा