अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर…

SHARE:

अमरावती : अमरावती येथून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या अपघाताच्या घटनेमुळे अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. खोडके लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा दिल्या जात आहेत. संजय खोडके यांच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. एका चारचाकी गाडीने दुचाकीवर असणारे आमदार संजय खोडके यांना उडवलं. यामुळे संजय खोडके जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीला कसं सामोरं जावं, कसं लढावं, कुणाला उमेदवारी द्यावी आणि विरोधकांचा कसा पराभव करावा, यासाठी प्रत्येक पक्षात रणनीती आखली जात आहे. अमरावतीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अशा हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचा उद्या मोठा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीसाठी संजय खोडके निघाले होते.

अमरावती शहरात अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे हव्या त्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे यासाठी संजय खोडके हे दुचाकीने प्रवास करतात. आजदेखील ते बैठकीला दुचाकीने जात होते. पण रस्त्याने जात असताना अचानक आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात आमदार संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

संजय खोडके यांचा अपघाताच्या नंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते आपल्या प्रकृतीची माहिती देताना दिसत आहेत. तसेच ते आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील देताना दिसत आहेत. “अपघातात मला थोडासा कंबरेला मार लागला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, माझी तब्येत चांगली आहे. कुणीही चिंता करण्याची गरज नाही. मला बरं व्हायला एक आठवडा जाईल. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, उद्या अमरावतीत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी करा”, असं आवाहन संजय खोडके यांनी केलं आहे.

Leave a Comment

अधिक वाचा