
मुंबई – मुंबई महापालिकासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर झाली असताना शरद पवारांची राष्ट्रवादीने ठाकरे गटासह काँग्रेससोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. याचदरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे हाती लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ६ संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे-
१. मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रभाग क्रमांक १३१
२. माजी नगराध्यक्षा मनीषा रहाटे- प्रभाग क्रमांक ११९
३. जिल्हाध्यक्ष अजित रावराणे- प्रभाग क्रमांक ४३
४. जाहिदा सिराज अहमद- प्रभाग क्रमांक १२४
५. माजी नगरसेवक धनंजय पिसाळ- प्रभाग क्रमांक १११
६. रुई खानोलकर प्रभाग क्रमांक- प्रभाग क्रमांक १७०
जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट –
आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडीसंदर्भात चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे. आज दुपारी १ वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे ३१ जागा तर काँग्रेसकडे २९ जागांचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान –
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक २०१७ रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.
२०१७ चे पक्षीय बलाबल – २२७ नगरसेवक
शिवसेना- ८४
भाजपा-८२
काँग्रेस- ३१
राष्ट्रवादी काँग्रेस- ९
मनसे- ७
समाजवादी पक्ष- ६
एमआयएम- २
अपक्ष- ५





