जळगाव – जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. ७५ जागा असलेल्या महापालिकेत भाजपला ४६ जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेला २२, शिवसेना (उबाठा) ५, एनसीपी शरद पवार गटाला १, कांग्रेस १ आणि अन्य एक उमेदवार निवडून आला. महापालिकेत भाजपा शिंदेसेना युतीला सत्ता मिळाली असली तरी ३१ हजार मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. ही राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा माणली जात आहे.
महानगरपालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ नगरसेवक पदांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात होते. मात्र, मतदान यंत्राचा निकाल समोर आल्यावर अनेकांची झोप उडाली. जळगाव शहरातील ३१ ,७०४ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत नोटाला मत दिले. मतदारांनी अनेक दिग्गजांचे वारसदार, बड्या नेत्यांची मुले आणि अगदी मंत्र्यांचे पीए नशीब आजमावत कोणालाही लायक समजले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात धाबे दणाणले आहे.
शहरात उमेदवारांविषयी सर्वाधिक नाराजी प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिसून आली. या एकाच प्रभागात तब्बल ३००६ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. त्यांनी या प्रभागातील उमेदवारांना लायक समजले नाही. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ११, ५, १, १५, ३, ८, १२, १६ आणि १३ या प्रभागांमध्येही मतदारांनी उमेदवारांना नाकारले. सर्वात कमी नोटाचा वापर प्रभाग क्रमांक ७ मध्ये झाला. येथे २९३ मतदारांनी नोटाचे बटन दाबले.
प्रभाग क्रमांक १५ (अ) मध्ये राज्याचे दिग्गज नेते आणि नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद भगवान देशमुख भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचे आव्हान होते. असे असतानाही या प्रभागात ३ टपाली मतांसह तब्बल ८५४ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.
केवळ सामान्य जनताच नाही, तर निवडणूक कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १३ (ड) मध्ये नोटाचा वापर करणाऱ्या ८९३ मतदारांपैकी तब्बल ३९८ मते ही टपाली आहेत. एका प्रभागात टपाली मतांचे एवढे मोठे प्रमाणनोटाकडे जाणे ही राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.
याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत देखल असाच प्रकार दिसून आला आहे. येथे ३० हजार ९७६ मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता नोटाला मतदान केले आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये एससी महिला गटात ९०४ मतदारांनी कोणताही उमेदवार सक्षम वाटला नाही आणि त्यांनी नोटाला पसंती दिली.महापालिकेत ७८ प्रभागांपैकी १८ ठिकाणी ५०० हूंन अधिक मतदारांनी नोटाचे बटन दाबले आहे. एकूणच मोठ्या संख्येने उमेदवारांच्या गर्दी मतदारांना आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी एकही योग्य उमेदवार न वाटणे, हे राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.





