बीड – परळी मधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीकडून दोघांची नार्काे चाचणी होणार आहे, तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. बीड जिल्ह्यातील महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आता एसआयटीकडून मुंबईतील ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्काे चाचणी तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली जाणार आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या एसआयटीने निर्णय घेतला आहे. महादेव मुंडे यांची हत्या होऊन २ वर्षांहून अधिक काळ निघून गेला आहे. आता बीड जिल्ह्यातील महादेव मूंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्काे टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्काे चाचणी पूर्ण झाली आहे. आज तिघांपैकी दोघांची नार्काे आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल. एसआयटीने 7 जणांच्या नार्काे टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता. एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची तपासणी नाकारण्यात आली आहे. आता ६ जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली आहे.
ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली, ते सर्व जण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते, तर आज होणार्या चाचण्यांमधील दोघे जण वाल्मीक कराड याच्या घरी कामाला होते. तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती मिळाली आहे. एसआयटीने गेल्या ६ महिन्यांत २०० लोकांची चौकशी केली आहे. १५० हून अधिक संशयित आणि ५०० हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले आहेत. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे.
यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यातील परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा परळीतील तहसील कार्यालयासमोर खून करण्यात आला होता. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ जमिनीच्या कारणावरून झाली आहे.
यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. आता बीड येथील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात वेगवान घडामोडी घडत आहेत. तर या महादेव मूंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत होते, ही माहिती मिळाली आहे. अलीकडच्या काळात बीडमध्ये गून्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. याप्रकरणात अधिक तपास बीड पोलिस करत आहेत.





