ओडिसा – घोटाळ्यात नाव आल्यानंतर विरोधी पक्षातील नेते किती घाबरतात याचा एक प्रकार ओडिशा राज्यातून समोर आला आला. राज्यातील चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर आणि या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर बिजू जनता दलाचे (बीजेडी) बालासोरचे माजी खासदार रबिंद्र कुमार जेना यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी बीजेडी खासदार रबिंद्र कुमार जेना यांनी ओडिशातील सीशोर चिट फंड घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर १२ मार्च रोजी सीबीआय न्यायालयात होणार्या सुनावणीच्या एक दिवस आधी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जेना म्हणाले की भाजप हा एकमेव पक्ष आहे जो ओडिशा तसेच भारताचा विकास करू शकतो. जेना यांनी गेल्या मंगळवारी बीजेपी प्रमुख नवीन पटनायक यांना लिहिलेल्या पत्रात ‘वैयक्तिक कारणे आणि परिस्थिती’ असे नमूद करून बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
जेना यांनी बीजेडीच्या तिकिटावर २०१४ मध्ये बालासोर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पाच वर्षांनंतर ते भाजपच्या प्रताप सारंगी यांच्याकडून पराभूत झाले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही. बीजेडीने त्यांच्या पत्नी सुबासिनी जेना, ज्या आधीच बस्ता येथील बीजेडीच्या आमदार आहेत, त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्याच मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तिने काँग्रेस उमेदवार बिजन नायक यांना पराभूत केले होते.
काँग्रेस नेते अमिया पांडव रबिंद्र जेना यांच्यावर निशाना साधताना म्हणाले कि हे सगळं पैशाबद्दल आहे. भ्रष्ट लोकांना माहिती आहे की ते भाजपमध्ये सामील झाल्याशिवाय सुरक्षित राहणार नाहीत. जेना केवळ त्यांचे पैसे आणि व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपमध्ये सामील झाले.
उल्लेखनीय म्हणजे एप्रिल २०२४ च्या एका अहवालानुसार २०१४ पासून, केंद्रीय एजन्सींकडून चौकशीच्या फेर्यात अडकलेल्या विरोधी पक्षातील २५ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनोरंजक म्हणजे, या २५ नेत्यांपैकी २३ नेत्यांना चौकशीला सामोरे जाणाऱ्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला आहे. तीन नेत्यांवरील खटले पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत आणि इतर २० जणांविरुद्धची चौकशी थांबली आहे. अहवालात असे म्हटले आहे की या यादीत सार्वत्रिक निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वीच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सहा नेत्यांचा समावेश आहे.





