पुणे – भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भोंदू अशोक खरात याला कॉल केला किंवा नाही याचा शोध घेतला पाहिजे, असे ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोबाईल फोनचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले. मात्र, राज्यातील विरोधक मागणी करुनही त्यांना सीडीआर मिळत नाहीत. मग अंजली दमानिया यांना ही सगळी माहिती कोण पुरवते? अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेल्या सीडीआर रेकॉर्डच्या यादीत भाजपच्या एका नेत्याचाही समावेश कसा नाही? असा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात सीडीआर डेटा बाहेर काढला, पण अंजली दमानियांकडे हे सीडीआर रेकॉर्ड आले कुठून, हा एकच प्रश्न आम्हाला पडतो. अंजली दमानिया म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात याला १७ कॉल केले होते. या सगळ्याचा इनकमिंग आणि आऊटगोईंग रेकॉर्डही आणि हे कॉल कधी केले होते, कॉल ड्युरेशची माहितीही समोर आली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला १७ कॉल केले तेव्हा त्याचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. पण ज्यांनी अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा सुशोभीकरणाचा निधी मंजूर केला. त्यांचा एकही कॉल रेकॉर्ड सापडला नाही का? अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेल्या सीडीआर रेकॉर्डसमध्ये भाजपच्या एका माणसाचाही कॉल नाही. काहीतरी गडबड सुरु आहे. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भोंदू अशोक खरात याला कॉल केला किंवा नाही, याचा शोध घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात तपासाला इतके दिवस होऊनही एसआयटीकडून कोणतीच स्पष्ट माहिती दिली जात नाही. अशोक खरात याचे सीडीआर आणि संपत्तीची तपासणी करावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात शिवानिक ट्रस्टच्या सदस्यांनी तपासणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. मग गमे, नामकर्ण आवारे, पोफळे यांना का ताब्यात घेण्यात आले नाही. भांडे नावाचा अधिकारी एसआरए खात्यात का गेला होता? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. अंजली दमानिया प्रत्येक वेळी सरकारी गोपनीय माहिती बाहेर काढतात. एसआयटीकडून माहिती येत नाही. अंजली दमामियाकंडून माहिती येते आहे. याचा अर्थ प्रकरण संपवायचे नाही, फक्त राज्यातील काही राजकीय लोक बदनाम करायचे आहेत, असा हेतू आहे का? या भोंदू अशोक खरात प्रकरणात महाराष्ट्रातील लेकींच्या अब्रुशी खेळले गेले आहे, त्यांना तुरूंगात पाठवणे महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.





