मुंबई – भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे भोंदू खरातच्या अडचणी दिवसांदिवस वाढत चालल्या आहेत. दरम्यान आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंगचे वळण मिळाले आहे. अशोक खरातने ऑस्ट्रेलिया, दुबईसह पाच देशांमध्ये हवालामार्फत हजारो कोटी रुपये पाठवल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार-पाच देशांत हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे. खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक हजार कोटींहून अधिक रुपये या देशांमध्ये पाठवले असल्याचे कळते, हा केवळ एका भोंदू बाबाचा प्रश्न नसून हे एक मोठे आर्थिक नेक्सस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हा विषय केवळ आर्थिक गुन्ह्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारा आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर राज्य सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणाचा वापर राजकीय गोळाबेरजेसाठी किंवा सत्तेच्या समीकरणांसाठी न करता, सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात तरी ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवला टोला लगावला आहे. दरम्यान, आधीच लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीसह १२ गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशीचा फास अधिक घट्ट झालेल्या भोंदू अशोक खरातच्या या आरोपाने आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा एन्ट्री घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोंदू अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचेही फोटो समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





