आयपीएल २०२६ : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. राजस्थानने यासह सलग चौथा सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे.
वैभव सूर्यवंशी याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या मोसमातील १६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान १२ बॉलआधी आणि ६ विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने १८ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. राजस्थानने यासह सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. राजस्थान १९ व्या मोसमात सलग ४ सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. तसेच राजस्थान विरूद्धच्या पराभवामुळे आरसीबीला सलग २ विजयानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.
गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये टॉसआधी आणि टॉसनंतर पावसाने विघ्न घातलं. त्यामुळे सामन्याला तब्बल ७० मिनिटांच्या विलंबाने सुरुवात झाली. सामन्याला ८ वाजून ४० मिनिटांनी सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही एकही ओव्हर कमी करण्यात आली नाही.
राजस्थानचा फिल्डिंगचा निर्णय
राजस्थानच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन रियान पराग याने आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीसाठी कॅप्टन रजत पाटीदार याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रजतने ४० बॉलमध्ये ६३ रन्स केल्या. अनुभवी फलंदाज विराट कोहली याने १६ बॉलमध्ये ३२ रन्स केल्या. वेंकटेश अय्यर याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून छाप सोडली. वेकंटेशने १५ बॉलमध्ये २९ रन्स केल्या. तसेच इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळीमुळे आरसीबीला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २०१ धावांपर्यंत पोहचता आलं.
तर राजस्थानच्या जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा या तिघांनी बंगळुरुच्या प्रत्येकी २-२ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांनी १-१ विकेट घेतली.
राजस्थानची बॅटिंग
राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याने १३ धावांचं योगदान दिलं. यशस्वीच्या रुपात राजस्थानने पहिली विकेट गमावली. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याने ध्रुव जुरेल याच्यासोबत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.
वैभवने फक्त २६ चेंडूत सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. वैभवने ७८ रन्स केल्या. वैभवने २६ बॉलमध्ये ८ फोर आणि ७ सिक्स लगावले. त्यामुळे सामना एकतर्फी झाला. वैभव आणि ध्रुव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ रन्स जोडल्या. ध्रुवनेही तडाखेदार खेळी केली. ध्रुवने ४३ बॉलमध्ये नॉट आऊट ८१ रन्स केल्या. ध्रुवने या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. तसेच रवींद्र जडेजा याने बॉलिंगनंतर बॅटिंगनेही दम दाखवला. जडेजाने २५ बॉलमध्ये नॉट आऊट २४ रन्स करत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं.
राजस्थानची पहिल्या स्थानी झेप
दरम्यान राजस्थानला सलग चौथ्या विजयामुळे दुहेरी फायदा झाला आहे. राजस्थानने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.





