ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एसटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार; आमदार प्रवीण स्वामी यांच्या समोर घडली घटना

SHARE:

धाराशिव – जिल्ह्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एसटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आमदारांसमोरच कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी आता समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासमोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका एसटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीतच शासकीय कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेने धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासमोरच एसटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने उमरगामधील सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. उमरगा पोलीस ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. उमरगा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

एसटी कर्मचाऱ्याला मारल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. उमरगा-नागूर ही बस का सोडली नाही, याची विचारणा करण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी कार्यकर्त्यांसह बसस्थानकात गेले होते. यावेळी आगार व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदारांच्या कार्यकर्त्यांनी मोठा वाद केला आहे. या वादातून ड्युटीवर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. आमदारांसमोरच हा प्रकार घडल्याने उपस्थित नागरिक आणि कर्मचारी संतप्त झाले. ही सर्व घटना बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.

आपल्या सहकाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. एसटी कर्मचाऱ्यांनी उमरगा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले आहे, आणि या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. काही काळ पोलीस उमरगा पोलिस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर उमरगा पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य ओळखून मारहाण करणार्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणि कलम १२१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत उमरगा एसटी आगारातील कर्मचार्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी हे स्वतःला सामान्य आमदार म्हणून संबोधतात. मात्र, त्यांच्या ठाकरेगटाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करून एका एसटी कर्मचार्याला बेदम मारहाण केल्यामुळे तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्हयात ही सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास उमरगा पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा