गोंदिया – शाळेचे गेट अंगावर कोसळल्यामुळे पाचवीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. निराली मनीष चाफले असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षण क्षेत्राला सुन्न करणारी ही वेदनादायी घटना गोंदिया जिल्हयातील तिरोडा नगर परिषदेकडून संचालित लोधीटोला येथील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेत घडली. योगायोग म्हणजे निरालीची आई शुभांगी चाफले याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोधीटोला येथील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत होते. तसेच निराली सुटी झाल्यानंतर आईसोबत घरी जाण्यासाठी शाळेबाहेर पडत होती. याच दरम्यान तिचा प्रवेशद्वाराला हात लागल्याने लोखंडी गेट तिच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत निराली गेटखाली दबून गंभीर जखमी झाली. तिची आई व शिक्षकांनी तिला बाहेर काढून तातडीने तिरोडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी तिला गोंदिया येथे नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
लोधीटोला येथील पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. हा गेट सरकविणारा होता. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेकदा या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीची मागणी पालकांनी केली होती. यासंबंधीचा प्रस्तावही नगर परिषदेकडे प्रलंबित असल्याची आहे. यापूर्वीसुद्धा हा गेट चारदा पडला होता. तेव्हा त्यात एक जण जखमीसुद्धा झाला होता.
मात्र यानंतरही नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन दुरुस्ती केली नाही. शेवटी हा गेट कोसळल्याने निराली चाफले या विद्यार्थिनीचा आपल्या जिवाला मुकावे लागले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही घटना शाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
निराली ही अत्यंत हुशार आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तिचा सन्मानही करण्यात आला होता. एका उज्ज्वल भविष्याची आशा असलेल्या गुणवंत मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून शाळा आणि परिसरात शोककळा पसरली आहे. निरालीची आई शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.





