नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. मात्र, रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजिनामा द्यावा लागला. त्यानंतर रुपाली चाकणकर दीड महिना फारश्या सक्रिय नव्हत्या. आता त्यांनी बैठक घेतल्याचे समोर आले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर येताच राज्यात खळबळ माजली होती. अनेक महिलांवार दैवी शक्तीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली. त्यानंतर खरातचे अनेक महिलांसोबतचे व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांचे देखील खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता रुपाली चाकणकरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजिनामा द्यावा लागला. आता जवळपास दीड महिन्यांनंतर रुपाली चाकणकर या सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बैठकीचे फोटो व्हायरल
रुपाली चाकणकर पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये नेमकी कशाबाबत चर्चा झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नांदूर येथील बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी गोतावळ असे कॅप्शनही दिले आहे.
रुपाली चाकणकरांनी दिला राजिनामा
चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, “मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.”






