साक्षीदाराला धमकी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अडचणीत, गुन्हा दाखल

SHARE:

बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग अशी धमकी साक्षीदार दादा खिंडकरला देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. साक्षीदार दादा खिंडकरला त्याच्या भावाकडूनच धमकी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर याला या केसमध्ये साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्याच्या लहान भावानेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर आहे. हा संतोष देशमुख प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय आहे. दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना, त्याचा लहान भाऊ समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी आला.

त्याने जुन्या वादाची कुरापत काढत दादा खिंडकरला धमकावून सांगितले आहे की, तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस. आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण मिटवून घ्यायला सांग. लहान भावाच्या या धमकीवजा इशार्यावर दादा खिंडकरने, तुला याच्याशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर, असे उत्तर दिले आहे. या उत्तरावर मनात राग धरून लहान भाऊ समाधान खिंडकर याने दादा खिंडकरला शिवीगाळ केली.

या प्रकारानंतर दादा खिंडकरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू आहे.

यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हत्या प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी भावानेच धमकी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात आणखी तपास बीड पोलिस करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा