मुंबई – कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळे हटवण्याची कारवाई केल्यानंतर नवीन वाद चिघळला आहेे. कल्याण डोंबीवली महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता खासदार श्रीकांत शिंदे याच्या इशार्यावर कारवाई केल्याचा आरोप भीक्कू संघ करत आहे. या कारवाईनंतर बौद्ध समाजातील विविध संघटना, भीक्कू संघ आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांती तीव्र संताप व्यक्त करत या घटनेविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या कामासाठी सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील काही बुद्धमूर्ती आणि भिमकोरेगाव प्रतिकृती स्तंभ, इतर साहित्य झाडे हटवण्यात आली. पोलिसांच्या समोरच महापालिकेच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. याचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर बौद्ध समाजातील विविध संघटना, भीक्कू संघ आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांती तीव्र संताप व्यक्त करत आहे.
पालिका आयुक्त गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की ही संपूर्ण कारवाई नियमानुसारच पार पडली आहे. प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी ही जागा अत्यावश्यक असल्याने त्यानुसार नोटिसा देण्यात आल्या होत्या. ज्या जागेवर कारवाई करण्यात आली ती जमीन महापालिकेच्या मालकीची आहे. त्याची स्पष्ट नोंद सातबारा उताऱ्यावर आहे. कारवाईदरम्यान परिसरातील गौतम बुद्धांच्या चार मूर्ती आणि अन्य धार्मिक साहित्य अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित ठेवून बुद्धभूमी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींकडे सोपवण्यात आले.
मात्र बुद्धभूमी फाऊंडेशनने महापालिकेचे सर्व दावे फेटाळून लावले. फाऊंडेशनशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही योग्य पूर्वसूचना न देता आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अचानक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन बुद्धमूर्ती, तीन बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती, भिक्खू निवास, धर्मशाळा तसेच विहाराची तोडफोड करण्यात आली.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी फाऊंडेशनने केली आहे. तसेच महापालिका आयुक्त, संबंधित प्रशासकीय अधिकारी, पोलिस यंत्रणा आणि उड्डाणपुलाचे काम करणारी टीएनटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वादात सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या एका खुलाशामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. बुद्धभूमी फाउंडेशनची जागा ही अनधिकृतपणे केडीएमसीच्या नावावर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. मूळ जागा मालकाने ती जागा विकलेली नसतानाही, एका विकासकाने ती जागा विकल्याचे दाखवून त्यावर टीडीआर लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे पालिकेच्या भूमापन आणि नगररचना विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






