जळगाव – मतदार यादी मोहिमेत शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षकांसह 13 कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील मतदार यादी कामात हलगर्जीपणा शिक्षकांना महागात पडला आहे. जळगावात शिक्षकांसह कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 कर्मचार्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेत मतदार यादीतील मॅपिंग, अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती आणि अन्य प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर 2025 पासून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. विविध बैठका, आढावा सभा आणि पत्रव्यवहारातून कामेे पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे निर्धारित मुदतीत पूर्ण केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मतदार यादी पुनर्निरीक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे काम मानले जात आहे. त्यात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप जळगाव प्रशासनाने केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 च्या कलम 32 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जळगावातील शिक्षक, लिपिक आणि मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या 13 जणांमध्ये अर्जुन काशीनाथ ठाकरे, फारूक शाह हानिफ शाह, शुभम रमेश गजभिये, सुकलाल चव्हाण, हितेंद्र विलास जोशी, हुसेन सरदार तडवी, मोहंमद परवेज शेख हुसेन, भागवत तुळशीराम महाजन, कोमल निळकंठ तायडे, संजय गोपाळ चौधरी, कल्पेश गोपाल पवार, संजीव नामदार तडवी, कल्पेश यशवंत पाटील यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास जळगाव पोलिस करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






