शेतकऱ्याची लूट अंगलट आली; लाचखोर तहसील अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई

SHARE:

धुळे – तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्वारी बिलासाठी 5 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक व शासकीय गोदाम व्यवस्थापकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीकडून पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.

धुळे तहसिल कार्यालयातील या अधिकार्याने ऑनलाइन बिल प्रक्रिया पुढे सरकवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. शेतकर्याकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने ही कडक कारवाई केली आहे. मनिष महेश बागुल असे अटक करण्यात आलेल्या तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अंचाडे गावातील एका शेतकऱ्याने आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या शेतातील ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.

नियमानुसार त्यांनी ज्वारीचा माल धुळे येथील शासकीय गोदामात जमा केला होता. मात्र, ज्वारीची मोजणी झाल्यानंतर आणि पावत्या दिल्यानंतर पुरवठा निरीक्षक मनिष बागुल याने शेतकऱ्याला बाजूला बोलावून ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी तसेच ऑनलाइन बिल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर पैसे न दिल्यास बिल प्रक्रिया रोखण्याची धमकी तहसिल कार्यालयातील अधिकार्याने दिल्याचे समोर आले आहे.

शासकीय कामासाठी लाच देण्यास नकार देत संबंधित शेतकऱ्याने धुळे जिल्ह्यातील एसीबी विभागीय कार्यालयात कायदेशीररित्या तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तहसिल कार्यालयातील अधिकार्याला पुराव्यासह पकडण्यासाठी शासकीय गोदामात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे शेतकरी पैसे देण्यासाठी गेल्यानंतर मनिष बागुल याने 5 हजार रुपयांची लाच घेतानाच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आहे.

या प्रकरणी तहसिल कार्यालयातील अधिकार्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कडक कारवाईमुळे राज्यातील शासकीय खरेदी-विक्री केंद्रांवर सर्वसामान्य शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्यात शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींकडून कोणत्याही कामासाठी लाच मागितल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी एसीबीच्या विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास धुळे एसीबी विभाग करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment