मुंबई – कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी अत्यंत महत्वाचा माणल्या जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या 15 वर्षांपासून सुरू असून अद्यापही या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र काम अपूर्ण असूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या मार्गावर टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. यामुळे या महामार्गावरून ये- जा करणार्या कोकणातील प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई-गोवाया राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. या मोठ्या कालावधीत अनेक बड्या कंत्राटदार कंपन्या बदलण्यात आल्या परंतु महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर, एकट्या रायगड जिल्ह्यात केवळ 70 टक्के काम पूर्ण होऊ शकले असून 30 टक्के काम अजूनही प्रलंबित आहे.
मात्र काम अपूर्ण असूनही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या महामार्गावर खारपाडा येथे पहिला टोल सुरू करून टोल वसूली सुरू करण्यात आली आहे. ही एकप्रकारे या महामार्गावरून ये- जा करणार्या प्रवाशांची लूट असून या विरोधात कोकणातील प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जेव्हा रस्ताच अपूर्ण आहे तर मग टोल वसूली कशी काय सुरू केली? असा थेट सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गाच्या अपूर्ण कामाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील वाहतुकीला बसत आहे. जिल्हयातील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. कोलाड येथील पूलांचे कामे अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ, नागोठणे, कोलाड येथील सर्विस रोडची कामेही अपूर्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते कांटे दरम्यानच्या मार्गाचे काम अपूर्ण आहे. चिपळूण, संगमेश्वर येथील पूलांची कामेही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूली करू नये, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
माहित असावे कि काही दिवासांपूर्वी माजी खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे काम 31 मे पर्यंत म्हणजे पावसाळ्याआधी पूर्ण होईल, असा दावा केला होता. मात्र आता जून महिना सुरू झाल्यानंतरही काम अपूर्ण असून गडकरी यांनी केलेला दावा फुस्स ठरला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






