लाचखोर तहसीलदाराचा पर्दाफाश: ६ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीकडून अटक

SHARE:

जालना – तहसिलदाराला 6 लाखांहून अधिक रूपयांची लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडचा तहसिलदार विजय चव्हाण याला 6 लाख 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथून ही घटना उघडकीस आली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी लाच घेताना अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण याला बीड एसीबीने अटक केली आहे.

या प्रकरणात तक्रारदाराचे पोकलेन मशीन आणि 6 हायवा ट्रकद्वारे अंबडमध्ये अवैध वाहतूक सुरू होती. या वाहनांवर आणि पोकलेनवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता ती नियमित सुरू ठेवण्यासाठी तहसिलदार विजय चव्हाण याने तक्रारदाराकडे दरमहा 7 लाख रुपयांच्या लाच मागितली होती. तहसिलदाराने मोठी रक्कम मागितल्याने फिर्यादीने बीड एसीबी विभागाकडे संपर्क केला. त्यांनी या प्रकरणी एसीबी विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने अंबड येथे सापळा रचला होता. दरमहा 7 लाख रुपये मागितले होते, परंतु फिर्यादीने तहसिलदाराला 6 लाख 40 हजार रुपये देण्याचे मान्य केले. शनिवारी ठरलेली लाचेची रक्कम 6 लाख 40 हजार रुपये स्वीकारताना तहसिलदार विजय चव्हाण याला एसीबीच्या पथकाने पकडले आहे. तहसिलदार विजय चव्हाण याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे जालना जिल्हयातील प्रशासकीय कार्यलयात खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील वाळू माफिया आणि महसूल विभागाचे आर्थिक संबंध उघड झाले आहेत. कारवाई न करण्यासाठी लाच घेणारे जालना जिल्ह्यातील असे इतरही अधिकार्यांवर एसीबीची नजर राहणार आहे. अब्दीमंडी येथील 250 एकर निर्वासित जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणात 2024 साली तहसिलदार विजय चव्हाण याला शासनाने निलंबित केले होते.

अब्दीमंडीच्या निर्वासित संपत्तीच्या फेरफाराची आणि नोंदणीची प्रक्रिया करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप तहसिलदार विजय चव्हाण यांच्यावर करण्यात आला होता.याप्रकरणात शासनाने त्यांना निलंबित केले होते. या घटनेत अधिक चौकशी एसीबी करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment