गोदावरी नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना; 3 महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

SHARE:

बीड – गोदावरी नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. 3 महिलांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण जखमी झाले आहेत. बीड जल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा बोट बुडत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेले भाविक नदी पार करण्यासाठी बोटीतून प्रवास करत होते. यावेळी अचानक बोटीचा ताबा सुटल्याने ती नदीपात्रात उलटली आहे. बोटीत 50 हून अधिक नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड रा. लोणार यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला आहे. तर कांताबाई ज्ञानदेव आंधळे रा. सिंदखेडराजा यांचा ही उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

याशिवाय आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सिंधुबाई अर्जुन मावळे रा. महागाव यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आणि बचावकार्य सुरू केले. अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेत बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का? तसेच अपघातामागील नेमके कारण काय? याचा तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment