गडचिरोली – सरकारी अधिकाऱ्याला बेदम मारहाण प्रकरणात काँग्रेस नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीचे कर संवर्धन अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या भीषण हल्ल्यात सरकारी अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यासह त्यांच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार असे गुन्हा दाखल झालेल्या काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. त्यांच्यासह त्यांच्या इतर 3 साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी वैभव पांढरे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते अहेरी-वेंकटरावपेठा मार्गावरील अबनपल्ली फाटा परिसरात पोहोचले असता, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच अडवले.
काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सरकारी अधिकारी वैभव पांढरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या हात आणि पायांनाही मार लागला आहे. अधिकारी पांढरे यांच्यावर हल्ला होताच त्यांनी आरडाओरडा केला आहे. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. नागरिकांना येत असल्याचे पाहून हल्लेखोर तिथून पळून गेले.
उपस्थित नागरिकांनी अधिकारी पांढरे यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला झालेली दुखापत आणि झालेला प्रचंड रक्तस्त्राव पाहता त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेयात आले आहे.
या प्रकरणी पीडित सरकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह त्यांच्या 3 साथीदारांविरुद्ध हल्ला केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेचा अधिक तपास गडचिरोली ग्रामीण पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






