तामीळनाडूतील क्रांती-प्रतिक्रांती; जीवंत मॉडेल सोडून मेलेले मॉडेल्स उरावर घेतले, म्हणून पेशवाई वाजत-गाजत आली !

SHARE:

(भाग – ५) – कोणत्याही सामाजिक-राजकीय उलथा-पालथीचे विश्लेषण हे एकांगी असू शकत नाही. संघ-भाजपा बुद्ध फुले, आंबेडकर, पेरियार, शाहू यांच्या विचारांना गाडून टाकण्यासाठी प्रयत्न करणारच! ते ‘‘त्यांचे’’ काम आहे आणी ‘‘ते’’ आपले काम ईमाने-ईतबारे तन-मन-धन लावून पार पाडतात. सातशे वर्षांची जागतिक पातळीवरची बौद्ध क्रांती एका पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीत खतम झाली. पण प्रतिक्रांती झाल्यानंतर ‘‘ब्राह्मण-राज’’ आणण्यासाठी त्यांनाही किमान 700 वर्षांच्या प्रदिर्घ काळात प्रचंड चिकाटीने अहोरात्र काम करावे लागले. पण नेमके त्याचवेळी आमचे तत्कालीन शुद्रादिअतिशूद्र बौद्धजन काय करीत होते? आजच्या काळात देश-पातळीवरची पेशवाइची प्रतिक्रांती होत असतांना आमचे आजचे नेते जे करीत आहेत, तेच त्याकाळाचे नेतेही करीत असणार! 

आज भारतात जेवढेही छोटे-मोठे पक्ष सत्तेत आहेत किंवा सत्तेच्या जवळपास आहेत ते सर्व पक्ष (फक्त  तीन अपवाद वगळता) ब्राह्मण व क्षत्रियांच्या मालकीचे पक्ष आहेत. कॉंग्रेस व भाजपा हे उघडपणे ब्राह्मणांच्या मालकीचे पक्ष आहेत. जे प्रादेशिक पातळीवरचे सत्तेच्या वर्तुळातील पक्ष आहेत ते पवार व शिंदे (मराठा), ठाकरे (ब्राह्मण-सीकेपी), नवीन पटनाईक (ब्राह्मण), चंद्रशेखर राव (जमीनदार क्षत्रिय), जगनमोहन रेड्डी (जमीनदार क्षत्रिय), चंद्रा बाबू नायडू (सवर्ण), ममता बॅनर्जी (ब्राह्मण) यासारखे ब्राह्मण अथवा जमीनदार (क्षत्रिय) वर्ण-जातीचे आहेत. सत्तेच्या जवळपास असणारे व आजही ब्राह्मणवाद्यांविरोधात प्रामाणिकपणे लढणारे तीनच राजकीय पक्ष आहेत आणि हे तीनही राजकीय पक्ष ओबीसी नेतृत्वाखालील पक्ष आहेत. पहिला अर्थातच सामी पेरियारवादी डी.एम.के. (DMK), दुसरा लढवैय्या पक्ष आहे समाजवादी-लोहियावादी लालू प्रसाद यांचा रा.ज.द. (RJD) आणि तीसरा लढवैय्या पक्ष आहे समाजवादी लोहियावादी मुलायम सिंगांचा स.पा. (SP)! ओबीसी नेतृत्वाखालील हे तीनही पक्ष जातीअंताकडे जाण्यासाठी आशेचा किरण उरलेले आहेत. बाकीचे स्वतःला पुरोगामी, डावे व फुले-आंबेडकरवादी समजणारे पक्ष सत्तेच्या शक्यतेच्या वर्तुळातून बाहेर फेकले गेले आहेत व त्यातील बहुतेक सर्वच पक्ष उघडपणे वा छुपेपणाने संघ-भाजपाला शरण गेले आहेत. ब्राह्मणी छावणीच्या विरोधात प्रामाणिकपणे व प्राणपणाने लढणारे तीनही पक्ष ओबीसी नेतृत्वाखालील पक्ष आहेत, हा काही योगायोग नाही. काळाच्या गरजेनुसार नियतीने ओबीसी नेत्यांवर टाकलेली ती एक जबाबदारी आहे व त्यामागे ऐतिहासिक व सांस्कृतिक कारणे आहेत. 

लालू-मुलायमचे संघ-भाजपाविरोधी गड कमजोर झाल्यानंतर ब्राह्मणी प्रतिक्रांतीविरोधात प्रामाणिकपणे व आक्रमकपणे लढणारा व सत्तेत असलेला एकमेव आशेचा किरण होता तामीळनाडूच्या DMK चा मजबुत किल्ला! परंतू ब्राह्मणवाद्यांनी जे षडयंत्र बिहारमध्ये लालूंच्या राजदविरोधात व उत्तरप्रदेशात मुलायमसिंगांच्या सपाविरोधात केले तेच षडयंत्र तामीळनाडूमध्ये स्टॅलिनच्या डीएमकेविरोधात केले व हा ब्राह्मणविरोधी एकमेव मजबूत किल्ला आज तरी सत्ताहीन झालेला दिसतो आहे.

देशाच्या शूद्रादिअतिशुद्र असलेल्या दलित ओबीसींच्या समोर एक आदर्श मॉडेल म्हणून तामीळनाडूचे मॉडेल उभे आहे. तामीळनाडूमध्ये ना फुले आहेत, ना आंबेडकर आहेत, ना शाहू महाराज! तेथे आहेत फक्त आणी फक्त सामी पेरियार! एखाद्या राज्यात महापुरूषांची संख्या जास्त आहे म्हणून ते राज्य पुरोगामी होत नाही. राज्यातील संख्येने जास्त असलेल्या या महापुरूषांचा दुरूपयोगच जास्त होत असतो. महापुरूषांच्या नावाने लोकांना आपापल्या जातीच्या इगोत व विचारांच्या डबक्यात कोंबून ठेवले जाते. माझ्याच जातीचा महापुरूष खुप मोठा, असे सांगून जातीय-ईगो पोसले जातात व हे ईगो कुरवाळले जातात. जेवढे महापुरूष कमी तेवढी क्रांतीची शक्यता जास्त! महापुरूषांची ‘‘भाउ-गर्दी’’ पेशव्यांच्या ब्राह्मणी-प्रतिक्रांतीस कारणीभूत ठरत असते, हे महाराष्ट्र व पश्चिम बंगालने सिद्ध केलेले आहे. 

ब्राह्मण तर आपल्या जातीतून एकही महापुरूष (Voltaire) निर्माण होउ देत नाहीत. ‘ब्राह्मणांमध्ये एकही महापुरूष (Voltaire) नाही’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवले आहे. परंतू ब्राह्मण हे आपल्या जातीत ‘महापुरूष (Voltaire) निर्माणच होऊ देत नाहीत, हे गुपित कोणालाच कळत नाही. ब्राह्मण जातीत एकही महापुरूष (Voltaire) नाही, म्हणूनच ते 85 टक्के बहुजनांवर बिनधास्तपणे राज्य करू शकतात, हे रहस्य आजपर्यंत कोणालाच उलगडले नाही. ‘‘महापुरूष तुमचे… भांडी घासतात आमचे!’’ हे ब्रीदवाक्य आहे ब्राह्मण जातीचे! एका पीढीसाठी क्रांतीकारक असलेले महापुरूष पुढच्या पीढीसाठी पायातल्या बेड्या बनतात व पुढच्या टप्प्यावरील क्रांतीचे अडथळे बनतात. कालचे फुलेशाहूआंबेडकर आज केवळ जातीचे ईगो कुरवाळण्यासाठी वापरले जात आहेत. या महापुरूषांचा 1 टक्केइतका जरी उपयोग क्रांतीसाठी केला असता तरी महाराष्ट्रातच काय देशात कुठेही पेशवाईची प्रतिक्रांती झालेली दिसली नसती.

आज देशात जीवंत असलेले एकमेव क्रांतीचे मॉडेल आहे- सामी पेरियार जात्यंतक अ-ब्राह्मणी मॉडेल! देशातील किती पुरोगामी म्हणविणार्‍या नेत्यांनी सामी पेरियार स्वीकारला? नेत्यांचं जाउ द्या, विचारवंतांचं काय? साहित्यिकांचं काय? यशस्वी झालेल्या व कार्यरत असलेया क्रांतीकारी जीवंत मॉडेलला नाकारून कांशिराम-लालू-मुलायमचे मेलेले मॉडेल उराशी धरून ठेवत असाल तर तुमचे खड्यात जाणे निश्चित आहे!

सामी पेरियार यांच्या योगदानाशी कुठेही तुलना होऊ शकत नाही. ब्राह्मणवादाशी कुठेही तडजोड नाही. ना सामाजिक, ना राजकीय जीवनात! ‘100 पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे घ्या’, ही तडजोडीची भानगडच पेरियाकडे नव्हती. ‘थोडेफार पदरात पाडून घेण्यासाठी कधी कॉंग्रेस तर कधी भाजपाशी जुळवून घ्या’, असला ‘तोडी-पाणीचा’ गंदा-धंदा पेरियार यांनी कधीच केला नाही. युती-आघाडीचा ढोंगी व सौदेबाजीचा प्रकार पेरियार यांच्या कडे नव्हता. ते कुणाचीही भीडभाड ठेवत नव्हते. ब्राह्मणांनी स्तोम माजवलेल्या काल्पनिक देवी-देवतांना त्यांनी भर चौकात चपलेने बडवले. नाम-फलकावर ब्राह्मण नाव असलेल्या हॉटेलांवर कायद्याने बंदी आणन्यास भाग पाडले. महात्मा गांधींचे पुतळे तोडण्याची हिम्मत पेरियारशिवाय दुसर्‍या कोणत्या महापुरूषात असू शकते? भारतीय संविधानाला जगभर डोक्यावर घेतले जात असतांना पेरियार यांनी संविधानातील न पटणारी पाने जाहीररित्या जाळली. हे संविधान जातीव्यवस्थेला व ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारे आहे, असे स्पष्ट व परखड मत त्यांनी अनेक जाहिर सभांमध्ये मांडलं. सच्ची रामायण नावाचा ग्रंथ लिहून रामाला खलनायक व रावणाला हिरो बनवलं. केवळ ग्रंथ लिहून पेरियार थांबले नाहीत तर, राम, गणेश, सरस्वती या सारख्या ब्राह्मणी प्रतिकांना भर चौकात चपलेने बडवले. ब्राह्मणी संस्कृतीविरोधात अ-ब्राह्मणी संस्कृतीचा हा फार मोठा संघर्ष होता व या सांस्कृतिक संघर्षामुळेच तामीळनाडूतील ओबीसी-दलित जनता एकत्र आली व ब्राह्मणी छावणीची सत्ता उलथवून टाकली.

महामानव बुद्धाने केवळ वैचारिक क्रांती केली, म्हणजे भिक्खूसंघामार्फत प्रबोधनाची महा-चळवळ (Enlightenment-Renaissance Movement) राबविली आणी रक्ताचा एक थेंब न सांडता दास-शूद्र वर्णाने ब्राह्मणी वर्णव्यवस्था नष्ट केली. वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती बुद्धाने जेवढ्या सहजतेने केली, त्याच्यापेक्षा हजारो पटीने कठीण होते जातीव्यवस्थेच्या विरोधात लढणे. म्हणूनच जातीव्यवस्थेविरोधात लढता-लढता बुद्ध धम्माची दमछाक झाली व सरतेशेवटी त्याने भारतातून हद्दपार होणे स्वीकारले. मैदानी वा सामाजिक लढाईत दोनच पर्याय असतात, एकतर विजयी होऊन सत्ता ताब्यात घ्या किंवा मग पराभूत होऊन गुलामगिरी स्वीकारा! तिसरा पर्याय आहे- ‘आत्महत्त्येचा’! बौद्ध धम्माने तीसरा पर्याय स्वीकारला! भारतातून हद्दपार होणे म्हणजे आत्महत्त्या करणे होय! ब्राह्मणी जातीव्यवस्थेला जैन, लिंगायत वगेरे क्रांतीकारी धर्म शरण गेलेत, परंतू बौद्ध धम्माने हद्दपार होणे पसंत केले.

जातीव्यवस्थेच्या तुलनेत वर्णव्यवस्थेच्याविरोधात लढणे अत्यंत सोपे होते कारण ब्राह्मणी गुलामाची शिकार असलेले शूद्र (दास) एकाच वर्णाचे होते. या एकमेव शुद्रवर्णात स्पृश्य-अस्पृश्य, दलित-ओबीसी असा कोणताही भेद नव्हता. म्हणून या शूद्रवर्णाने संघटितपणे ब्राह्मणवादाविरोधात लढा उभा केला व ते जिंकले. कष्टकरी शूद्र जनता संघटित राहिली तर ब्राह्मणवादाचा पराभव हमखास होतो, याचा बोध ब्राह्मणवाद्यांनी घेतला आणी त्यांनी जातीव्यवस्थेची निर्मिती करून हा शुद्र वर्ण उतरंड असलेल्या हजारो विषम जातीत विभागला. एकमेव शुद्र वर्णाला ते केवळ जातीत विभागून थांबले नाहीत, ब्राह्मणांनी त्यांच्यात असे वर्गीकरण केले की जेणेकरून ते पुन्हा एकत्र येणे अशक्य व्हावे. ब्राह्मणांनी या शूद्र जातींना स्पृश्य व अस्पृश्य या दोन गटात विभागले. दलित-ओबीसींना विभागणारी ही अपारदर्शक मजबूत भींत ब्राह्मणांनी मोठ्या कष्टाने उभी केली. मात्र तरीही, मंडलयुगाने व सामी पेरियारयुगाने स्पृश्य व अस्पृश्यांना एकत्रित आणून ब्राह्मणविरोधी सत्ताकारण यशस्वी केले. परंतू, ब्राह्मणवाद्यांनी पुन्हा दलित व ओबीसींना विभागून मंडलयुग व पेरियारयुग पराभुत केले आहे. त्यामुळे आज पेशवाईची ब्राह्मणी प्रतिक्रांती बिनधास्तपणे वाजत-गाजत आलेली आहे. ती आता तुमच्या उरावर बसणार आणी तुमच्या गळ्याला मडके व गांडीला झाडू बांधणार! 

या लेखमालेच्या सहाव्या व शेवटच्या लेखांकात लालू, मुलायम व स्टॅलिन हे ब्राह्मणवादाविरोधात लढणारे गड कोसळण्यास ते स्वतःही कसे जबाबदार आहेत, याचे आत्मपरीक्षण करणार आहोत!

तो पर्यंत जय जोती, जय भीम व जय पेरियार !

 

लेखक –
प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क –  ८१ ७७ ८६ १२ ५६

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment