नागपूर – नाभिक समाजाकरिता नागपूर व विदर्भामध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणाऱ्या नाभिक एकता मंच च्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नाभिक समाजाचा स्नेहबंध समाज सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या मध्ये वधू-वरांसाठी मेळावा, त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी, एमबीबीएस, बीएएमएस, अशा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय कामगिरी करणाऱ्या प्रावीण्य प्राप्त गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. नाभिक समाज हा अल्पसंख्यांक समाजांमधून मोडला जातो. ओबीसी मध्ये असून लहान भावाची भूमिका बजावत असताना नाभिक समाजाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. या संकटांशी दोन हात करण्यासाठी नाभिक एकता मंच नेहमीच कटिबद्ध असते.
समाजाची एकजूटता टिकवण्यासाठी समाजा मध्ये असलेली विषमता दूर करण्याचे कार्य नाभिक एकता मंचावतीने नेहमीच केले जाते. नाभिक एकता मंचला दहा वर्षे पूर्ण झाले असून मागील दहा वर्षांमध्ये नागपूर जिल्ह्यातील तसेच विदर्भातील बरेचशे जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे संघटन संघटनेच्या वतीने उभे करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज वलूकार यांच्या नेतृत्वामध्ये संघटना मोठ्या प्रमाणात बळकट करण्यात आली आहे. दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार श्यामकुमार बर्वे, नागपूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. नीता ठाकरे, काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव जयंत दळवी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ. सुनील अतकर तर उद्घाटक म्हणून एम. डी. अर्बन व एम. डी. टाऊन चे संचालक मनोहर देशकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ वतन चे संपादक गोपाल कडुकर, रवी कुकडे, प्रवीण पारधी, रमेश राऊत, माधव चन्ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विकास लाखे तर आभार प्रदर्शन हरिराम चोपकर यांनी केले. कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे व समाज बांधवांचे स्वागत नाभिक एकता मंच चे मार्गदर्शक नानाभाऊ कुकटकर व नाभिक एकता मंच संस्थापक अध्यक्ष धनराज वलुकार यांनी केले.

समाजाला दिशा देण्याचं कार्य नाभिक एकता मंच करत आहे –
नाभिक एकता मंच च्या वतीने आयोजित स्नेहबंध समाज सोहळा निमित्य रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी नाभिक एकता मंचच्या कार्याची दखल घेत संघटनेची बांधणी व समाजाला दिशा देण्याचे कार्य याचे भरभरून कौतुक केले. आपण स्वतः रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार या नात्याने रामटेक मध्ये असलेल्या सर्व समाज बांधवांसाठी समाज मंदिराची उभारणी तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षणासाठी वाटेल ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा सर्व समाज बांधवांनी फायदा घ्यावा –
नाभिक समाजाच्या स्नेहबंध मेळाव्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांनी संपूर्ण समाजाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फायदा घेण्याचे व त्यापासून आपल्या कौशल्यामध्ये वृद्धी करण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व समाजाला विकसित करण्याचं काम आम्ही करत आहोत व नेहमी करत राहू असे यावेळी त्यांनी म्हटले.
नाभिक समाजासोबत बारा बलूतेदारांचा सुद्धा विकास व्हावा हीच अपेक्षा –
यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जयंत दळवी यांनी नाभिक समाजाच्या सोबत सोबत बारा बलूतेदारांचे संघटन मजबूत व्हावं व बारा बलूतेदारांचा एक सोबत विकास व्हावा अशी आशा व्यक्त केली व नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कॉलरशिप मिळावी, त्याचबरोबर महाज्योती मधून फेलोशिप करिता विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे व स्वतःची उत्तरोत्तर प्रगती करावी असे आवाहन केले.
येत्या काळात विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन मजबुतीकडे लक्ष दिले जाईल –
नाभिक एकता मंच च्या कार्याला दहा वर्षे पूर्ण होत असून नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात संघटन मोठ्या प्रमाणात बळकट करण्यात आले आहे. येत्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी संघटन मजबूत करण्याचं काम नाभिक एकता मंचावतीने करण्यात येईल असे आश्वासन नाभिक एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष धनराज वलुकार यांनी दिले.

असंख्य वधू-वरांची नोंदणी व पुस्तकाचे विमोचन –
संघटनेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद दिले असून पाचशेच्या वर वधू-वरांची नोंदणी या वेळेला करण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमांमध्ये वधुवर सुचक पुस्तिकेचे विमोचन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी करिता यांचा होता सहभाग –
नाभिक एकता मंच वतीने आयोजित स्नेहबंध समाज सोहळा यशस्वी करण्याकरिता सर्वश्री विलास वाटकर, राजेश मानकर, उर्मिदास वलोकार, गजानन कुकटकर, लक्ष्मण सराटे, विकी साबळे, निलेश अतकर, ओम दवलेकर, अमोल ठमके, यादवराव बोरकर, राजेंद्र चौधरी, अरविंद वाटकर, महेश सावरकर, अविनाश वलोकर, योगेश देहंकर, प्रियंका खातखेडे, राजेश साबळे, भूषण खातखेडे, गणेश उमरकर, मनोज बाभुळकर, गणेश खैरकर, राजीव फोपसे, विजय मुळे, संतोष वैद्य, वसंत घडीनकर, ललित कान्होलकर यांनी विशेष श्रम घेतले व हजारो नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






