अकोला : ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, या मागणीसाठी दि. १ जुलै रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी अधिकार हक्क व संरक्षण परिषदेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
जातनिहाय जनगननेची मागणी –
ओबीसी समाजाचे अधिकार संरक्षित राहावेत, आरक्षण अबाधित ठेवावे आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी परिषदेने राज्य व केंद्र सरकारकडे देशभरातील ओबीसी जातींची जातनिहाय जनगणना तातडीने करण्याची मागणी केली.
५० % आरक्षणाची मर्यादा हटवा –
तसेच, महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षण संरक्षणाच्या नावाखाली स्थापन केलेली उपसमिती तात्काळ बरखास्त करावी. महाराष्ट्रात मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुमारे ५८ लाख ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी. तसेच ओबीसी, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यासाठी लागू असलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली.

मागण्यांची अमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा –
राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ठराव मंजूर करावा. मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने आर्थिक मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक सहाय्य द्यावे. तसेच, ओबीसी आरक्षण आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे पूर्णपणे मागे घ्यावेत, सरकारने ओबीसी समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिषदेतर्फे देण्यात आला.
प्रमुख नेत्यांनी केले संभोदीत –
या धरणे आंदोलनात ओबीसी समाजातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी केले. यावेळी अ. भा. सावता परिषदेचे कल्याण काका आखाडे, धोबी समाज आरक्षण कृती समितीचे अनिल शिंदे, प्रा. डॉ. संतोष हुशे, कुणबी समाजाचे नारायण गव्हाणकर, प्रवीण वाघमारे, लक्ष्मण निखाडे, अकोला जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश तायडे, महेश गणगने यांनी उपस्थिताना संबोधित केले. तर ओ.बी.सी. जनमोर्चा चे जिल्हाध्यक्ष अतुल नवात्रे, प्रतिभा अवचार, मायाताई ईरतकर, माजी जि.प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे, विष्णू मेहरे, जनार्दन हिरळकर, रामदास गाडेकर, पुष्पाताई गुलवाडे, शंकरराव इंगळे, सदाशिव शेळके, ज्योती निखाडे, नंदू बोपुलवार, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संघटना झाल्या होत्या सहभागी –
अ. भा. कुणबी समाज मंडळ, बारा बलुतेदार महासंघ, अ. भा समता परिषद, अ. भा. सावता परिषद, धनगर समाज मंडळ, माळी महासंघ, ओबीसी जनमोर्चा
उपोषण कर्त्यांचा सत्कार –
याच धरणे आंदोलन मध्ये या पूर्वी ओबीसी आरक्षण मिळवीण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्या पाचही उपोषण कर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जनार्दन हिरळकर, पुष्पाताई गुलवाडे, ॲड. भाऊसाहेब मेडशीकर, शंकर पारेकर, संतोष ढोमणे यांचा सत्कार करण्यात आला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






