तुकारामांना गुरुकृपा झाल्यानंतर संत नामदेवांनी स्वप्नात येऊन कवित्व करण्याविषयी आदेश दिल्यानंतर तुकारामाना कवित्व करण्याची प्रेरणा मिळाली आणि तुकारामांची काव्य सरिता दुथडी भरून वाहू लागली. तुकाराम बांधेसूद, प्रमाणबद्ध, लोकांच्या मनाचा ठाव घेतील असे अभंग लिहू लागले. या अभंगात स्वानुभव जास्त असल्याने लोकांना ते आपलेसे वाटू लागले.
इ. स. १६५० मध्ये तुकारामांची जीवित यात्रा संपली. या अल्पशा आयुष्यात त्यांनी सुमारे साडे चार हजार अभंग रचना केली. तुकारामांच्या अभंगांच्या एकूण चार प्रति आजवर उपलब्ध झालेल्या आहेत. पहिली प्रत तुकोबांचा थोरला मुलगा महादेव यांच्या हातची आहे. दुसरी तळेगाव दाभाडे येथील वारकरी भक्त त्र्यंबक कासार यांनी चाळीस वर्षे खपून अभंग मिळवून तयार केली आहे. तिसरी प्रत गंगू तात्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वारकरी संप्रदायाच्या उपयोगकरिता सुधारून तयार केली आहे. चवथी प्रत कडूस येथील गंगाजी मावळ यांच्या घराण्यातील आहे.
सर अलेक्झांडर ग्रँट यांच्या प्रेरणेने त्या वेळच्या मुंबई सरकारने विष्णू परशुराम पंडित व शंकर पांडुरंग पंडित यांच्या संपादकत्वाखाली तुकारामांच्या अभंगाची संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली.ही गाथा “शंकर पांडुरंगी” किंवा “इंदुप्रकाश गाथा” किंवा “सरकारी गाथा” या नावाने प्रसिद्ध आहे. गाथेला जेव्हा तीनशे वर्षे पूर्ण झाले तेव्हा तेव्हा १९५० ला मुंबई सरकारने कै. पू. म. लाड यांच्या संपादकत्वाखाली अभंगगाथा प्रसिद्ध केली. त्या बरोबरच लाड यांनी तुकारामांचे चरित्र ही लिहिले.
त्यानंतर “तुकारामांची सार्थ गाथा “ तुकारामांची अस्सल गाथा”, छापल्या गेल्या. प्राचार्य दांडेकर यांनी धार्मिक वाड्मय प्रकाशन मंडळ द्वारा “श्री तुकाराम महाराजांचा सार्थ गाथा” ची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध केली. यामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचा अन्वय व अर्थ लावण्याचे महत्वाचे काम केल्या गेले. अभंगांचे संकलन ह. भ. प. रावसाहेब नेऊरगावकर यांनी केले. अशाप्रकारे अर्थ विवरणाच्या दृष्टीने उपयुक्त. स्वरूपात अभंगागाथा जनतेच्या समोर आली. त्यानंतर अनेकांनी तुकारामाच्या अभंगावर लिहिले आहे आणि हे काम अविरत चालू आहे.
तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेत अनेक विषयांवर अभंग आहेत. उदा. साधक अवस्था, सिद्ध अवस्था, संत, पंढरी नामसंकीर्तन, भक्ती, उपदेशपर, बालक्रीडा, निरनिराळ्या आरत्या, रूपके, भूपाळ्या, देवाचे दर्शन, परमेश्वरा संबंधी उत्कंठा आणि तळमळ, साक्षात्कार झाल्यानंतरचे समाधान, सगुण आणि निर्गुण उपासना, असे अनेक विषय आढळतात.
आपल्या आयुष्यातील पारमार्थिक अवस्था तुकोबांनी अभंगातून उघड करून सांगितली. तुकोबांचे अभंग वाड्मय बहुतांशी उत्स्फूर्त तसेच आत्मविस्काराच्या स्वरूपाचे आहे.तुकाराम महाराज स्वतः वारकरी पंथाचे असल्याने त्यांच्या अभंगाचा बराचसा भाग त्यांच्या उपास्य दैवतवरच म्हणजे विठ्ठल म्हणजेच पांडुरंगावर आधारित आहे.
साधकवस्थेतून सिद्धावस्थे पर्यंत ते कसे पोहोचले. त्यांना आलेले अनुभव याबद्दल गाथा वाचताना तुकारामांच्या आयुष्यातील प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभे राहतात. तुकारामांचे सारे अभंग अनुभवाने व उपदेशाने भरलेले आहेत.
पांडुरंगाचे नाव घेता घेता तुकाराम महाराज म्हणतात,
“हरिनाम वेली पावली विस्तार l
फळी पुष्पी भार वोल्हावली ll”
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.





