दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी असलेल्या ‘शिक्षक दिना’ निमित्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुरुजी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देणारे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे शिल्पकार असतात. एक आदर्श गुरुजी केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतो. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हे आदर्श गुरुजींचे मुख्य कार्य असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये आणि त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात गुरुजींचा वाटा सर्वात मोठा असतो, म्हणूनच समाजात गुरुजींना अत्यंत आदराचे स्थान असते. पाच सप्टेंबर ही तरीख आदर्श गुरुजींचे स्मरण करून देते. चार सप्टेंबरला असा विचार करीतच मी झोपी गेलो आणि माझ्या स्वप्नात माझे गुरू मराठी विषयाच्या आदर्श गुरुजी विषयीचे विचार आले. मी स्वप्नातच मनोमन बोलू लागलो.
“मला माझ्या शालेय जीवनात अनेक गुरुजी लाभले, पण आमचे मराठी विषय शिकविणारे गुरुजी माझे सर्वात आवडते गुरुजी आहेत. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आणि विचार उच्च आहेत. ते नेहमी वेळेचे पालन करतात आणि वर्गात कधीही उशिरा येत नाहीत. गुरुजींच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हसू विद्यार्थ्यांचा सगळा ताण दूर करते. त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी, रंजक आणि प्रभावी आहे. कठीण पाठही ते गोष्टींच्या आणि उदाहरणांच्या माध्यमातून सहज समजावून सांगतात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता ते आपल्याला नैतिक मूल्ये आणि जीवन जगण्याची कला शिकवतात. वर्गातील हुशार आणि अभ्यासात मागे असणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना ते समान न्याय देतात. कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असल्यास, ते ती शांतपणे आणि प्रेमाने सोडवितात.
इतिहासाचा विचार केला तर आपल्या देशात शिक्षणाची गंगा आणणारे क्रांतियूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे सर्वात मोठे आदर्श शिक्षक आहेत. सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला पत्करून देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. अंगावर दगड-धोंडे आणि शेण फेकले जात असतानाही त्यांनी आपले अध्यापनाचे पवित्र कार्य सोडले नाही. विद्यार्थ्यांप्रती असणारी हीच समर्पित भावना आणि निष्ठा एका शिक्षकाला ‘आदर्श शिक्षक’ बनविते. माझे लाडके गुरुजी सुद्धा सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानतात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करतात. गुरुजींचे मराठी भाषेवरील आणि व्याकरणावरील प्रभुत्व थक्क करणारे आहे. त्यांच्या बोलण्यातील गोडवा आणि आपुलकीमुळे सर्व विद्यार्थी त्यांचा मनापासून आदर करतात. कविता गायन करून शिकवताना तर विद्यार्थी तल्लीन होऊन एकरूप होतात. माझ्यासह ती कविता विद्यार्थीही गायन करतात. ते कधीही विद्यार्थ्यांवर रागवत नाहीत किंवा त्यांना शिक्षा करीत नाहीत. चुका झाल्या तर त्या समजवून सांगून दुरुस्त करण्याची संधी ते देतात.
अभ्यासासोबतच ते आम्हांला खेळ, कला, वक्तृत्व, निबंध काव्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात गुरूजींचा पुढाकार असतो. संकटाच्या वेळी ते नेहमी मित्रासारखे पाठीशी उभे राहतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडे पाहून आम्हांला नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळते. ते आम्हांला केवळ एक चांगला विद्यार्थी नाही, तर एक उत्तम माणूस – उत्तम नागरिक बनविण्याचा सतत प्रयत्न करतात. गुरुजींच्या उत्कृष्ट आणि विविध अध्यापन पद्धतीतून शिकविल्यामुळेच मला मराठी विषयाची मनापासून गोडी आणि आवड निर्माण झाली आहे. त्यांच्या वर्गात सर्व विद्यार्थी अत्यंत एकाग्रतेने आणि आनंदाने बसतात. ते केवळ शाळेतच नव्हे, तर संपूर्ण समाजात आपल्या चांगल्या वर्तणुकीसाठी आदरास पात्र ठरले आहेत. अशा या गुणवान, प्रेमळ आणि विद्यार्थीप्रिय गुरुजींचा मला मनापासून अभिमान वाटतो. माझ्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या या आदर्श गुरुजींना मी चरणस्पर्श करतो.”
गुरुजींना चरण स्पर्श करण्यासाठी मी माझे दोन्ही हात समोर केले आणि बघतो तर काय मी झोपेतून जागा झालो होतो. घड्याळीत बघितले तर सकाळचे पाच वाजले होते. शाळेत जायची तयारी करायची होती. आज शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होती. या वक्तृत्व स्पर्धेच्या सूचना वहीत गुरुजींनी माझे नाव दोन दिवसापूर्वीच लिहिले होते. गुरुजींचा आशीर्वाद घेतला. वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली. निवेदकांनी माझे नाव घेतले. बघतो तर काय या वक्तृत्व स्पर्धेत माझ्या स्वप्नातील आदर्श गुरुजीचे प्रभावी व्यक्तिमत्व मी दमदारपणे सांगण्याचा प्रयत्न केला. वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जेव्हा लागला तेव्हा प्रथम क्रमांक माझा होता. मला खूप आनंद झाला. माझ्या गुरुजींनाही आनंद झाला. गुरुजींना आता मी प्रत्यक्ष चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला. असेच आदर्श गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला लाभो, ही शिक्षक दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो आणि शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोतो.
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






